देसगावच्या पुलास तडे
By Admin | Updated: August 14, 2016 22:10 IST2016-08-14T21:59:27+5:302016-08-14T22:10:04+5:30
देसगावच्या पुलास तडे

देसगावच्या पुलास तडे
स्थळ : देसगाव, कळवण
वेळ : सकाळी ११ वाजता
कळवण तालुक्यातील अभोणा-चणकापूर-तिऱ्हळ-देसगाव रस्त्यावरील देसगावजवळील गिरणा नदीवरील पूल अतिशय धोकेदायक बनला असून पुलास तडे जाऊन पुलावर मोठे भगदाड पडले आहे.
महाड येथील दुर्घटनेनंतर कळवण तालुक्यातील नदी, नाल्यावरील पुलाच्या दुरवस्थेमुळे आदिवासी बांधव भयभीत झाले असून या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व शासकीय यंत्रणा लक्ष देईल का ? असा टाहो आदिवासी जनतेने फोडला आहे.
देसगावच्यापुलास तडेदेसगाव पुलाला तडे जाऊन मोठे भगदाड पडले असून पुलावर मोठी झाडे उगवली आहेत, त्यामुळे केव्हा काय घडेल याची शाश्वती नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पुलाची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी तक्रारी करूनही शासकीय यंत्रणेने लक्ष दिले नसल्याची तक्रार या भागातील आदिवासी बांधवांनी केली आहे. या पुलाचे संरक्षक कठडेदेखील दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. चणकापूर धरणाचा जलसाठा या पुलापर्यंत असून येथील पाण्याची पातळी अतिशय खोल आहे. त्यामुळे दुर्दैवाने पुलामुळे एखादी अलिखित घटना घडली तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित विभागाच्या यंत्रणेने तत्काळ लक्ष द्यावे याकडे आदिवासी बांधवांनी लक्ष वेधले आहे. आठ ते पंधरा दिवसांपासून या रस्त्यावरून एसटी बसेस बंद केल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच अभोणा-बोरगाव रस्त्यावरील भिलजाई येथील लहान पुलाचा भराव पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे, मोहपाडा ते वडाळे (हा) या पुलाची परिस्थितीदेखील यापेक्षा वेगळी नाही. दरम्यान पुलाच्या दुरवस्थेबाबत सोशल मीडियावरील चर्चेकडे लक्ष वेधून अभोणा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे, कृउबा संचालक डी. एम. गायकवाड, सुधाकर सोनवणे, दीपक सोनजे, राजू पाटील या अभोणा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देसगाव पुलावर समक्ष जाऊन पाहणी केली असता त्यावेळी पुलाची दयनीय परिस्थिती समोर आली.