लाचखोर कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले
By Admin | Updated: July 14, 2016 23:58 IST2016-07-14T23:51:53+5:302016-07-14T23:58:17+5:30
राजीव गांधी भवन : सार्वजनिक बांधकाम विभागामधील लिपिक

लाचखोर कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले
नाशिक : निविदा भरताना जमा केलेली अनामत रक्कम कामाचा ठेका मिळाल्यानंतर परत मिळावी, यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संबंधित ठेकेदाराने अर्ज केला होता. या ठेकेदाराकडून वीस हजार रुपयांची लाच घेताना लिपिक शेखर निवृत्ती कावळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बांधकाम विभागाच्या कार्यालयात रंगेहाथ ताब्यात घेतले.
आडगावच्या मुस्लीम कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठेके दाराकडून निविदेमधील रकमेच्या दोन टक्क्याप्रमाणे तीस हजार रुपयांची मागणी कावळे याने केली होती. तडजोडीनंतर वीस हजार रुपये प्रथम देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर ठेकेदाराने काळेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुरुवारी (दि.१४) ठेकेदाराने रक्कम घेऊन राजीव गांधी भवनमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले. तत्पूर्वी दुपारी विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गोपनीयरीत्या सापळा रचला होता. ठेकेदाराकडून वीस हजार रुपयांची रोख रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कावळे घेत असताना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेत कोणालाही सापळा रचल्याची साधी शंकाही येऊ
दिली नाही. नव्याने आलेले आयुक्त अभिषेक कृष्ण हे सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर कावळे याला अटक केली. जेव्हा कावळे यास राजीव गांधी भवनतून अधिकारी बाहेर वाहनाकडे
घेऊन जात असताना लाच स्वीकारल्याची बातमी पालिकेच्या वर्तुळात पसरली.
पंधरवड्यापूर्वीच कावळे या लिपिकाची तत्कालीन आयुक्त गेडाम यांनी नाशिकरोडच्या घरपट्टी विभागामध्ये बदली केली होती; मात्र तरीदेखील कावळे हा सकाळी नाशिकरोड व दुपारी सोयीनुसार राजीव गांधी भवनच्या कार्यालयात येत होता.
ठेकेदाराने निविदा भरताना २५ हजार ६६१ रुपये अनामत म्हणून महापालिकेकडे जमा केले होते. (प्रतिनिधी)