लाचखोर अधिकारी सेवेत कायम
By Admin | Updated: May 8, 2016 00:38 IST2016-05-07T22:42:04+5:302016-05-08T00:38:31+5:30
मेहेरनजरचे गूढ : तक्रारदारांवर दबाव टाकण्यास सुरूवात

लाचखोर अधिकारी सेवेत कायम
नाशिक : तीन आठवड्यांपूर्वी वीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर पोलीस कोठडीची हवा खाल्लेल्या मंडळ अधिकाऱ्यावर महसूल खात्याकडून कोणतीही कारवाई तर झालीच नाही, उलटपक्षी मंडळ अधिकाऱ्यावर मेहेरनजर दाखवीत त्याला सेवेत कायम ठेवले आहे. जामिनावर सुटलेल्या या अधिकाऱ्याने तक्रारदारावर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याने प्रशासनानेच त्याला तशी मुभा दिल्याचा समज ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.
रवींद्र सोनवणे असे या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून, ग्रामस्थाचे जमिनीसंदर्भातील तक्रार रजिस्टरचे काम करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेताना १६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी असल्याने न्यायालयाने सोनवणे यास एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तिसऱ्या दिवशी सोमवारी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. सोनवणे यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने दुसऱ्याच दिवशी जिल्हा प्रशासनाकडून त्यास सेवेतून निलंबित करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. जामिनावर सुटलेल्या सोनवणे याने कामकाजात सक्रियता दर्शवित कार्यालयाचा ताबा घेतला. परिणामी त्याच्याविरुद्ध तक्रार केलेल्या तक्रारदारावर दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडूनही आपले काही होऊ शकत नाही, असा संदेशच त्यानिमित्ताने ग्रामस्थांमध्ये गेला आहे.