नगरसेवक निधीच्या कामांना लागणार ब्रेक
By Admin | Updated: September 26, 2016 01:31 IST2016-09-26T01:30:56+5:302016-09-26T01:31:21+5:30
निवडणूक : निधी उपलब्धतेची होणार अडचण

नगरसेवक निधीच्या कामांना लागणार ब्रेक
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक निधीतील कामे पूर्ण व्हावी याकरिता सदस्यांकडून दबाव वाढला असताना प्रशासनाकडून आतापावेतो निधीअभावी केवळ २० कोटी ६८ लाख रुपये कामांचीच प्राकलने तयार होऊ शकली आहेत. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत फारसा निधी उपलब्ध होऊ शकणार नसल्याने नगरसेवक निधीतील कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्तांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १३५७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे, तर महासभेने ते १७६१ कोटी रुपयापर्यंत नेऊन ठेवले आहे. परंतु आतापर्यंत महापालिकेकडे ३९२ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा होऊ शकले आहे. महासभेने प्रत्येक नगरसेवकाला विकास निधी म्हणून ५० लाखांची तरतूद केलेली आहे. त्यानुसार ७२ कोटी २० लाख रुपयांची कामे अपेक्षित आहेत, परंतु आतापर्यंत प्रशासन केवळ २० कोटी ६८ लाख रुपयांपर्यंतच कामांची प्राकलने तयार करू शकली आहे. उर्वरित कामांसाठी सुमारे ५० कोटींचा निधी आवश्यक आहे, परंतु निधीची उपलब्धता लक्षात घेता या कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)