लेझर शो बंद पडल्याने तोडफोड

By Admin | Updated: January 7, 2017 01:06 IST2017-01-07T01:06:42+5:302017-01-07T01:06:56+5:30

बॉटनिकल गार्डन : पर्यटकांना पैसे परत; शनिवारी शो बंदच ठेवण्यात येणार

Breakdown of laser show closes | लेझर शो बंद पडल्याने तोडफोड

लेझर शो बंद पडल्याने तोडफोड

नाशिक : दोन आठवड्यापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये लेझर शो सुरू होऊ न शकल्याने संतप्त नागरिकांनी तिकिटाचे पैसे परत मिळावे यासाठी गोंधळ घातल्याने या गोंधळात तिकीट खिडकीची तोडफोड झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे शो सुरू होऊ शकला नसून उद्या शनिवारीही शो बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.
पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू उद्यानात पालिकेने खासगीकरणातून बॉटनिकल गार्डन उभारले आहे.
नाशिकच्या वैभवात भर घालणाऱ्या या प्रकल्पाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना शुक्रवारी मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने शो पाहण्यासाठी आलेल्या नाशिककरांचा हिरमोड झाला. थंडीगारठ्यात लेझर शो पाहण्यासाठी बसलेल्या नागरिकांना शो बघता न आल्याने ५० रुपयांचे तिकीट काढून आलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला. लेझर शोसाठी उभारण्यात आलेल्या सर्व्हरमध्ये तांत्रिकअडचण निर्माण झाल्याने लेझर शो सुरू होऊ शकला नाही. या ठिकाणी सहा प्रोजेक्टर, लेझर लाइट्स तसेच साउंड सिस्टीम असा भार सर्व्हरवर असल्याने सायंकाळी सर्व्हर हॅँग झाला. येथील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही शो सुरू करण्यास त्यांना यश येऊ शकले नाही. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर शो रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तिकिटाचे पैसे परत मिळावे यासाठी एकच गोंधळ केला.
या गोंधळातच काही गुंडांनी तिकीट खिडकीची तोडफोड केल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे लहान मुलेही भयभीत झाली. एकूणच या प्रकाराची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Breakdown of laser show closes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.