जोरण : सटाणा तालुक्यातील जोरण येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिवसा व तसेच रात्री विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून, ग्रामस्थ हैराण झाले आहेत. येथील पाणीपुरवठा विहिरीने तळ गाठल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाणी राहते तर विद्युत पुरवठा खंडित राहत असतो. वीज राहिली तर पाणी राहत नाही. जवळच असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी असून, या शिवारात विद्युत पुरवठा चालू राहतो त्यामुळे शेतकरी पिकाला पाणी देतात. वीजपुरवठा खंडित राहत असल्याने माजी उपसरपंच सुभाष सावकार, पोलीसपाटील विश्वास देवरे तसेच ग्रामस्थांनी वीज उपकेंद्राच्या कार्यालयात जाऊन अभियंता पी.एफ. आहिरे यांना विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे गावात पिण्याचे पाणी पुरेसे येत नसल्याची तक्रार केली. तसेच पाणीपुरवठ्याच्या विहिरीतून उपकेंद्राला पाणीपुरवठा केला जातो. कमी दाबाने वीजपुरवठा मिळत असल्यामुळे गावाला पाणी द्यावे की सबस्टेशनला द्यावे, असा सवाल सुभाष सावकार यांनी केला. तसेच कोणी वीज चोरी करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.गावात सकाळी चार ते पाच तास वीज बंद राहते तर रात्रीच्या वेळी तीन, चार तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत भुरटे चोर चोऱ्या करतात. अंधाराचा फायदा घेत दोन तीन दिवसांपासून गावात चोरट्यांची दहशत पसरली आहे.जोरण उपकेंद्रावर भार येत असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास जोरण येथील महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलावर्गाने दिला. (वार्ताहर)
जोरण येथे विद्युत पुरवठा खंडित
By admin | Updated: April 30, 2017 00:21 IST