दिंडोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाला करावे लागत असताना ऐन मार्च एण्डच्या काळात लॉकडाऊन झाल्याने महसूल कर वसुलीला व विकासकामांना ब्रेक लागल्याने नियोजन कोलमडले आहे.कोरोनामुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात दिंडोरी नगर पंचायतीच्या मालमत्ता कर वसुलीत तब्बल पंधरा लाखांची घट झाली आहे. मागील वर्षी आतापर्यंत सुमारे ४५ लाख रुपयांची वसुली होती ती आज घटून ३० लाखांवर येऊन थांबली आहे. याचा परिणाम दैनंदिन आर्थिक कामकाजावर झाला आहे. नगरपंचायत फंडातील कामे थांबली आहेत. स्थानिक पातळीवर होणारी साहित्य खरेदीस, प्रलंबित बिले अदा करण्यास अडचण आली आहे.--------------------------१कोरोनामुळे कार्यालयीन कामकाज प्रभावित होऊन रोज जमा होणारे विविध दाखले फी, हस्तांतर शुल्क, नक्कल फी, इमारत हस्तांतरण फी, इमारत बांधकाम फी यामुळे दोन महिन्यात मिळणारे उत्पन्नात अंदाजे पाच लाखांची घट झाली आहे. त्याचबरोबर पगारासाठी शासनाकडून येणाऱ्या ९२ लाखांपैकी अवघे ६२ लाख रु पये अनुदान आले असून, यात तब्बल तीस लाखांची घट झाली आहे.२विकास सहाय्य अनुदान कामांसाठी येणारे २५ लाख रु पये शासनाकडून आलेले नाही. शासनाने ज्या प्रमाणे शासकीय कर्मचारी पगार कपात केली आहे त्यानुसार वेतन अदा केले आहे. शहर विकासाठी नगर पंचायतीकडून शहरात सुरू केलेली तब्बल तीन कोटीपेक्षा अधिक रकमेची विकासकामे सुरू होती व कोट्यवधींची कामे प्रस्तावित होती; मात्र ती लॉकडाऊन काळात बंद झाल्याने उत्पन्नासोबतच विकासही दोन महिने थांबल्याची स्थिती निर्माण झाली आहे. -----------३लॉकडाऊन शिथिल होत जुनी कामे सुरू झाली आहेत; मात्र पावसाळा तोंडावर व मजूर टंचाई यामुळे सारे नियोजन कोलमडले आहे. सध्या नागरिकांचे आरोग्य सुरक्षित कसे राखायचे यासाठी संपूर्ण प्रशासन अहोरात्र झटत आहे.---------------लॉक-डाऊनमुळे वसुली व विकास-कामांना ब्रेक लागला. काहीसे नियोजन विस्कळीत झाले होते; मात्र आता लॉकडाऊन शिथिल होताच कामे सुरू केली आहेत. नावीन्यपूर्ण योजनेतून नुकतीच साडेआठ कोटींची कामे मंजूर झालेली आहेत. त्यामुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.- रचना जाधव, नगराध्यक्ष-----------------------------कोरोनाच्या संकटामुळे कर वसुली थांबली व विकासकामे ही थांबवावी लागली. प्रशासन जनतेचे आरोग्य कसे सुरक्षित ठेवता येईल यासाठी प्रयत्नशील आहे. आता शिथिलता मिळाली असून, कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.- डॉ. मयूर पाटील, मुख्याधिकारी
कर वसुलीअभावी विकासकामांना ब्रेक; नियोजन कोलमडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:12 IST