अंदाजपत्रकात ‘नवनिर्माण’ला ब्रेक
By Admin | Updated: February 27, 2016 00:31 IST2016-02-26T23:23:25+5:302016-02-27T00:31:51+5:30
महापालिका : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची झोळी राहणार रिकामी

अंदाजपत्रकात ‘नवनिर्माण’ला ब्रेक
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या आर्थिक वर्षात आपापल्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांचे नारळ वाढविण्याचे नगरसेवकांचे मनसुबे आयुक्तांच्या अंदाजपत्रकाने धुळीस मिळणार आहेत. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सादर केलेल्या सन २०१६-१७ या वर्षाच्या अंदाजपत्रकात ‘नवनिर्माण’ला ब्रेक लावण्यात आला असून भांडवली कामांसाठी अर्थात विकासकामांसाठी अवघ्या २५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यातही चालू कामांसाठी सुमारे १७७ कोटींची देयके बाकी आणि स्थानिक संस्था करापोटी शासनाकडून मिळालेला जादा ६९ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता यामुळे येत्या वर्षभरात विकासकामांची झोळी रिकामीच राहणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. सदर रकमेतून महापालिकेचा बंधनात्मक खर्च ७८३.८३ कोटी, सिंहस्थ कामांसाठी महापालिकेचा हिस्सा २० कोटी, जेएनएनयूआरएमचा हिस्सा ७६ कोटी, मुकणे धरण पाणीयोजनेसाठी ५० कोटी, भूसंपादनाकरिता ५० कोटी, १९ टक्के राखीव निधी ६१.६५ कोटी, इतर उचल रकमा ५९.०७ कोटी व अखेर शिल्लक १.४१ कोटी वजा जाता २५६ कोटी रुपये भांडवली कामांसाठी उपलब्ध होणार आहेत. सन २०१५-१६ मध्ये भांडवली कामांसाठी ४१३.३२ कोटी रुपये म्हणजे ३७.११ टक्के खर्च झाला, तर सन २०१६-१७ या वर्षासाठी त्यात केवळ २०.१५ टक्के वाढ म्हणजे सुमारे ४९६.६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द झाल्याने महापालिकेला शासनाकडून मिळालेल्या सहायक अनुदानासह सुमारे ८२० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यातही शासनाने जादा ६९ कोटी रुपये दिल्याने सदर रक्कम शासनाला परत करावी लागणार आहे. येत्या आर्थिक वर्षातही सहायक अनुदान मिळेल, असे गृहीत धरून ३९० कोटी रुपयांची तरतूद अनुदान स्वरूपात उत्पन्नात दर्शविण्यात आली आहे. परंतु अनुदान न मिळाल्यास प्रत्यक्ष महसूल कमी होण्याची शक्यता आयुक्तांनी वर्तविली आहे.