‘भाकरी’ फिरण्याची परंपरा राहणार कायम

By Admin | Updated: January 7, 2017 00:41 IST2017-01-07T00:41:07+5:302017-01-07T00:41:18+5:30

व्यूहरचना : गटावर वर्चस्वासाठी नेतेमंडळींमध्ये रंगणार रस्सीखेच

The 'bread' will continue to be traded | ‘भाकरी’ फिरण्याची परंपरा राहणार कायम

‘भाकरी’ फिरण्याची परंपरा राहणार कायम

गणेश धुरी नाशिक
सातत्याने भाकरी फिरण्याची परंपरा कायम राखणाऱ्या गोवर्धन गटात यंदाही ही भाकरी फिरण्याची परंपरा कायम राहते काय? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. असे न झाल्यास पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचाच उमेदवार निवडून आल्यास ही परंपरा खंडित होण्याचीही दाट शक्यता आहे.
भौगोलिकदृष्ट्या गौण खनिजाचा भरमसाट ‘खजिना’ असलेल्या गावांचा समावेश या गोवर्धन गटात आहे. त्यामुळेच या गटावर वर्चस्व राखण्यासाठी जशी राजकीय पातळीवरून व्यूहरचना आखली जाते, तशीच ती व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनही आखली जात असल्याचे अनेक उदाहरणांवर दिसून आले आहे. येथील सारूळ काय आणि रायगडनगर काय, प्रत्येक गावात गौण खनिजाबाबतच्या या ना त्या घडामोडी घडत असतात. यातील काही गावे तर महसूल यंत्रणेच्या रडारवर असतात. हा सगळा सरकारी ‘रोष’ टाळण्यासाठीच मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून आपापले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी येथील नेतेमंडळी सातत्याने धडपडताना दिसते.
या गटात २००२च्या पंचवार्षिक निवडणुकीत कॉँग्रेसकडून बाळासाहेब गभाले हे गोवर्धन गावचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्याकाळी सत्ताही कॉँग्रेस व राष्ट्रवादीची एकत्र होती. त्यानंतरच्या काळात मात्र कॉँग्रेसच्या ताब्यात असलेला हा गट शिवसेनेने काबीज करीत बाबूराव रूपवते यांच्या माध्यमातून गोवर्धन गटावर शिवसेनेचा झेंडा कायम ठेवला. बाबूराव रूपवते यांनी अपक्ष नाना भालेराव यांचा पराभव केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असूनही काँग्रेसचे पी.के. जाधव तिसऱ्या नंबरवर होते. नंतरच्या काळात हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) राखीव झाल्याने येथून विद्यमान अध्यक्ष असलेल्या विजयश्री रत्नाकर चुंबळे निवडून आल्या आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट न दिल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रंजना भाऊसाहेब खांडबहाले यांना पराभूत केले.
कै. केरू नाना चुंबळे यांचा पक्षात दबदबा असूनही तिकीट नाकारण्यात आल्यानेच त्यांनी येथून बंडखोरीचा पवित्रा घेत स्नुषा विजयश्री यांना निवडून आणले. त्यात त्यांना शिवसेनेच्या बाबूराव रूपवते यांची छुपी मदत झाल्याची त्यावेळी चर्चा होती. येथून शिवसेनेच्या सुशीला उत्तम खांडबहाले तिसऱ्या क्रमांकावर होत्या. म्हणजेच विद्यमान सदस्य शिवसेनेचे बाबूराव रूपवते असूनही शिवसेनेच्या सदस्याचा पराभव झाला होता. या गटावर तसे राष्ट्रवादीकडून जि.प. अध्यक्षांचे पती रत्नाकर चुंबळे, माजी सभापती हिरामण खोसकर, कृृउबा संचालक भाऊसाहेब खांडबहाले यांचे नेतृत्व असून, शिवसेनेकडून नगरसेवक शिवाजी चुंबळे, उत्तम खांडबहाले, भाऊसाहेब झोंबाडे, बंटी गुंबाडे, भाजपाकडून अरुण खांडबहाले यांची तर काँग्रेसकडून मुरलीधर पाटील, माजी सदस्य बाळासाहेब गभाले, पी. के. जाधव यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरू शकतात.
हा गट अनुसूचित जमाती राखीव झाल्याने येथून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच पारंपरिक लढतीची शक्यता आहे. तरीही कॉँग्रेसचा पूर्वाश्रमीचा हा गट असल्याने काँग्रेसने येथून चांगला उमेदवार दिल्यास भाकरी फिरण्याची परंपरा कायम राहू शकते. गोवर्धन गट विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवित असल्याने या गटाची निवडणूक सर्वच राजकीय पक्षाकडून प्रतिष्ठेची केली जाण्याची शक्यता आहे. भाकरी फिरण्याच्या परंपरेला त्यामुळे येथे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Web Title: The 'bread' will continue to be traded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.