वैचारिक क्रांतीसाठी ब्राह्मण संघटन आवश्यक
By Admin | Updated: October 24, 2016 00:05 IST2016-10-24T00:04:07+5:302016-10-24T00:05:11+5:30
विद्याभिनव शंकर भारती : अखिल भारतीय ब्राह्मण वकील राज्य अधिवेशनात प्रतिपादन

वैचारिक क्रांतीसाठी ब्राह्मण संघटन आवश्यक
नाशिक : भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ व पवित्र असून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र या चारही वर्णाच्या प्रगती व मार्गदर्शनासाठी ब्राह्मण संघटन आवश्यक आहे़ यासाठी ब्राह्मण वकिलांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन शृंगेरीमठ गुरुपीठ कुडलीचे प़पू़ विद्याभिनव शंकर भारती यांनी केले़ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश आयोजित वकिलांच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते़ प़पू़ भारती पुढे म्हणाले की, पूर्वी गुरुकुलामध्ये संस्कार केले जात; मात्र सद्यस्थितीत इंग्रजी शिक्षणामुळे लोभ व प्रतिष्ठा वाढीस लागली असून, भारतीय संस्कृतीबद्दल अनादर निर्माण झाला आहे़ ब्राह्मण वकिलांनी न्यासासाठी आलेल्यास लवकरात लवकर न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत़ वकिलांनी कायदा निर्मितीपासून तर अंमलबजावणीपर्यंतचे सर्वच ज्ञान आहे़ त्यामुळे त्यांनी आपल्या या बुद्धिमत्तेचा उपयोग न्यायासाठी, समाजासाठी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़
समाजाला नीती देण्याचे काम आता वकिलांकडे
प्रथम सत्रात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी, डॉ़ मो़ स़ गोसावी यांनी वकिलांचे एकत्रीकरण, वकिलांच्या समस्या व भविष्यकाळातील आव्हाने, वकिली पेशातील करिअर व संधी, ब्राह्मण समाजाच्या वकिलांकडून असणाऱ्या अपेक्षा, न्यायसंस्थेत अधिकाधिक तरुण कसे जातील, याबाबत मार्गदर्शन केले़ जोशी यांनी पूर्वी समाजाला नीतीचे धडे हा धर्म देत होता़; मात्र ही व्यवस्था नष्ट झाल्याने हे काम वकिलांकडे आल्याचे सांगितले़ द्वितीय सत्रात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ़ महेश करंदीकर यांनी २५ टक्के वकिलांना तणाव असून आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये वकिलांचा चौथा क्रमांक आहे़ वकिली व्यवसायातील ३६ टक्के वकिलांचा घटस्फोट होतो़ त्यामुळे तणाव हा मेंदूची पर्यायाने निर्णयशक्ती क्षीण करतो़ त्यामुळे नेहमी चांगला विचार, कामाचे योग्य नियोजन, किमान पाच मिनिटे मेडिटेशन करण्याचा सल्ला करंदीकर यांनी दिला़