ब्राम्हणवाडे-सोनगिरी रस्त्यावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारा बनल्या धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:38 IST2018-10-09T17:37:15+5:302018-10-09T17:38:51+5:30
सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे - सोनगिरी रस्त्यावर लोंबकळणा-या विद्युततारा धोकेदायक बनल्या असून विद्युत तारांची उंची वाढविण्याची मागणी माजी सरपंच सतीश लहाणे यांच्यासह वाहनचालकांनी केली आहे.

ब्राम्हणवाडे-सोनगिरी रस्त्यावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारा बनल्या धोकेदायक
ब्राम्हणवाडे - सोनगिरी या रस्त्यावरील रामनगर फाट्याजवळील रोहित्राजवळून विद्युत तारा रस्त्यावरून गेलेल्या आहेत. या तारा अनेक दिवसांपासून रस्त्यावर लोंबकळत असल्याने हा परिसर धोकेदायक बनला आहे. रस्त्याच्या कडेला विजेचा खांब नसल्यामुळे या विद्युत तारांची उंची कमी झाली आहे. या रस्त्याने दिवसभर छोट्या - मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. दिवसभरात अनेकदा मोठी वाहने आल्यावर या तारा बांबूच्या साहाय्याने उचलून प्रवास करावा लागत आहे. दिवसभरात अनेकदा हा प्रकार होत असल्याने वस्तीवरील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही अवजड वाहन चालक या लोंबकळत असलेल्या तारांकडे सर्रास दुर्लक्ष करून प्रवास करत असल्यामुळे या तारांचा एकमेकांना घर्षण होऊन विजेचे लोळ पडण्याबरोबर तारा तुटण्याचे प्रकारही घडत आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत संबंधित विभागाला वारंवार सांगूनही दुरूस्ती होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधी येथे विद्युत खांब बसवून सदर तारांची उंची वाढविण्याची मागणी राणू लहाने, बाळु लहाने, नवनाथ लहाने, बंडु लहाने, संजय बोडके, विकी लहाने यांच्यासह शेतक-यांनी केली आहे.