नाशिक : मातेचे कपाळाचे कुंकू नियतीने हिरावून घेतले.... काबाडकष्ट करून लहानग्या पोटच्या मुलांना लहानाचे मोठे केले.... एक फौजदार, तर दुसरा कंडक्टर झाला... दोघेही आपापल्या पेशाप्रमाणे ‘लोकसेवक’ बनले; मात्र जन्मदात्री आईला विसरले, हेच मोठे दुर्दैव.... आज ही माउली जरी दारोदार भटकत असली तरी, कवी यशवंत यांनी वर्णविल्या आईच्या महतीप्रमाणे ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी’ हेच अटळ सत्य आहे.सध्या सोशल मिडीयावर या माउलीच्या जवळपास पावणेतीन मिनिटांची आपबिती सांगणारी चित्रफित व्हायरल होत आहे. या चित्रफितीत माउलीने उच्चारलेले शब्द हे संवेदनशील मनाच्या व्यक्तीला शहारे आणणारे असेच आहे. फौजदार झालेला मुलगा जेव्हा चौदा वर्षाचा होता, तेव्हा या माउलीचा आधार काळाने हिरावून घेतला, अपघातात पतीचा मृत्यू झाला तरीदेखील मातेने मुलांना काबाडकष्ट करून मोठे केले. त्यांना उच्चशिक्षण दिले, त्यामुळे दोघांना नोकरीही मिळाली. उतारवयात आपल्या जन्मदात्रीच्या सेवेची वेळ आली तेव्हा दोघांनीही हात वर केले.कंडक्टर म्हणतो, त्याला सगळं दिलं, मग आता तू त्याच्याकडेच जा तर फौजदार मुलानेही मातेची सेवा करण्यास असमर्थता दर्शविली आणि तिला घरात ठेवणे अशक्य कसे आहे, याची तजवीज कायदेशीरपणे केल्याची माउली सांगते. या फौजदाराने ती माऊली मानसिक रूग्ण असल्याचे प्रमाणपत्र नाशिकरोड येथील एका डॉक्टरकडून तयार करून घेतले आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनला दिले असे ती महिला सांगते. या व्हिडीओची सत्यता शहर व ग्रामीण पोलीस तपासत आहेत.दोघा संवेदनशील युवकांची सजगतानाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावर दोघा जागरूक संवेदनशील अज्ञात युवकांचे लक्ष प्रमिला नाना पवार (माउली) या वृद्धेकडे वेधले गेले. त्यांच्या संवेदना जागरूक झाल्या. त्या युवकांनी आस्थेने प्रश्न विचारत त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता माउली ‘व्यक्त’ झाली. माउली आपबिती सांगू लागताच या युवकांनी चित्रफित ‘रेकॉर्ड’ केली आणि सोशल मीडियामधून ती व्हायरल केली.व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वृद्धेच्या सांगण्याप्रमाणे त्या नावाच्या पोलिसाचा शोध घेण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. नाशिक शहर पोलीस दलात त्या नावाचा अधिकारी नसल्याची खात्री झाली आहे, तरीदेखील त्या नावाच्या पीएसआयचा तपास करत आहोत. तसेच त्या वृद्धेचाही पोलीस शोध घेत आहेत.-विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त
एक मुलगा फौजदार, तर दुसरा कंडक्टर अन् माउली दारोदार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:21 IST