ज्ञातीसंस्थांच्या समर्थनासाठी चढाओढ
By Admin | Updated: October 14, 2014 01:22 IST2014-10-14T00:34:11+5:302014-10-14T01:22:51+5:30
ज्ञातीसंस्थांच्या समर्थनासाठी चढाओढ

ज्ञातीसंस्थांच्या समर्थनासाठी चढाओढ
नाशिक : काही तासांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली असताना उमेदवारांकडून ज्ञातीसंस्थांचे समर्थन मिळविण्यासाठी चढाओढ लागली असून, त्या मोबदल्यात संबंधित ज्ञातीसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत ‘अर्थपूर्ण’ चर्चाही झडत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काही ज्ञातीसंस्थांमध्ये समर्थनावरून असलेले मतभेदही उघड होताना दिसून येत आहेत.
यंदा सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांना एकेका मतासाठी लढाई लढावी लागत आहे. मतदारसंघातील ज्ञातीसंस्थांचे एकगठ्ठा मतदान आपल्या झोळीत पडावे, यासाठी उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळ्या समाजाची मंडळे, विश्वस्त संस्था, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडून समर्थन मिळविले जात आहे. समाजसंस्थांकडून समर्थन मिळविताना त्या मोबदल्यात संबंधित समाज संस्थेला देणगी, कार्यालयासाठी जागा, इमारत बांधून देणे, सभागृह बांधून देणे, अस्तित्वात असलेल्या इमारतीची रंगरंगोटी-दुरुस्ती करणे, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे आदि आश्वासने दिली जात आहेत. उमेदवारांकडून संबंधित ज्ञातीसंस्थेकडून समर्थन मिळवितानाच तसे लेखी पत्र घेऊन ते वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचीही तत्परता दाखविली जात आहे; मात्र काही ज्ञातीसंस्थांमध्ये दोन ते तीन गट असल्याने समर्थन देण्यावरून त्यांच्यातील मतभेदही उघड होत आहेत, तर ज्ञातीसंस्थांना आमचे मत ठरविण्याचा अधिकार कुणी दिला, अशाही तीव्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. ज्ञातीसंस्थांमधीलच काही प्रसिद्धीलोलुप पदाधिकारी चमकोगिरी करत असल्याचा आरोपही होताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)