दालनात ओतले गटारीचे पाणी

By Admin | Updated: March 13, 2015 23:09 IST2015-03-13T23:08:18+5:302015-03-13T23:09:38+5:30

महिलांचा रुद्रावतार : दूषित पाणीपुरवठ्यामुळे कार्यालयात घातला धुडगूस, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

Bottled water in the bath | दालनात ओतले गटारीचे पाणी

दालनात ओतले गटारीचे पाणी

नाशिक : पंचवटीतील फुलेनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ९ मधील कालिकानगर भागात ड्रेनेज लाइन तुंबल्याने होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ फुलेनगरातील शेकडो महिलांनी शुक्रवारी पंचवटी विभागीय कार्यालयात धुडगूस घालत ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्याच्या दालनात गटारीचे पाणी ओतले. याशिवाय संतप्त महिलांनी कार्यालयातील टेबल-खुर्च्यांचीही उलथापालथ करत खिडक्यांच्या काचा फोडल्या. याचवेळी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडल्यानंतर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली आणि तातडीने कार्यालयात धाव घेत त्यांनी दिलेल्या उपाययोजनेच्या आश्वासनानंतर महिलांचा रागाचा पारा खाली आला.
प्रभाग क्रमांक ९ मधील काही घरांमध्ये शौचालयाचे दुर्गंधीयुक्त पाणी तुंबल्याने तसेच नळाला अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांच्याकडे केली होती. त्यानुसार घोलप यांनीही संबंधित विभागाकडे तक्रारीचा पाठपुरावा केला; परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. शुक्रवारी फुलेनगर परिसरातील महिलांनी पुन्हा एकदा घोलप यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दूषित पाण्यासंबंधी गाऱ्हाणे मांडले. यावेळी घोलप यांच्यासह सर्व महिलांनी पंचवटी विभागीय कार्यालय गाठले; परंतु संबंधित अधिकारी जागेवर नसल्याचे लक्षात येताच महिलांचा संताप अनावर झाला. महिलांनी थेट संबंधित अधिकाऱ्याच्या दालनाकडे धाव घेत आपल्या सोबत बादली भरून आणलेले ड्रेनेजमधील घाण पाणी कार्यालयात ओतले. याचवेळी संतप्त महिलांनी कार्यालयातील टेबलखुर्च्यांचीही उलथापालथ करत खिडक्यांच्या काचा फोडल्या. शिवाय तेथे उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्याही अंगावर गटारीचे पाणी फेकत त्यांना धक्काबुक्की केली. विभागीय कार्यालयात अचानक उडालेल्या या गोंधळामुळे सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली व पळापळ सुरू झाली. तणावाचे वातावरण निर्माण झाले. लागलीच पोलिसांना खबर केल्यानंतर पोलीस बळ दाखल झाले. मात्र, पोलिसांना बोलाविण्यात आल्याचाही राग महिलांनी व्यक्त केला आणि महापालिका कर्मचाऱ्यांना धमकावणे सुरूकेले. दरम्यान, महिलांसोबत आलेल्या नगरसेवक विशाल घोलप यांनी महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलांनी कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. विभागीय कार्यालयात महिलांचा मोर्चा आल्याचे व गोंधळ सुरू असल्याचे समजताच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण व विभागीय अधिकारी अ‍े. पी. वाघ यांनी कार्यालयात धाव घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी डॉ. घोलप व संतप्त महिलांशी चर्चा करून पाहणीदौऱ्यानंतर तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आणि संतप्त महिलांचा जमाव शांत झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Bottled water in the bath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.