रेशन धान्य घोटाळा प्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: February 3, 2016 23:32 IST2016-02-03T23:31:16+5:302016-02-03T23:32:59+5:30
फ्लोअर मिल मालकासह मॅनेजरला अटक : संशयित ठक्करकडून कोट्यवधींची धान्य खरेदी

रेशन धान्य घोटाळा प्रकरणी दोघांना अटक
नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल झालेल्या वाडीवऱ्हे रेशन धान्य घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार व फरार संशयित जितूभाई ठक्करकडून कोट्यवधी रुपयांच्या धान्याची खरेदी करून धनादेशाद्वारे रक्कम अदा करणाऱ्या कोल्हापूरच्या फ्लोअर मिल मालकासह त्याच्या मॅनेजरला बुधवारी (दि़ ३) पोलिसांनी अटक केली़ या दोघांचीही विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली़ दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी महसूल अधिकारी व रेशन धान्य दुकानदारांची गोपनीय चौकशी सुरू आहे़
विशेष मोक्का न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडताना अॅड. अजय मिसर यांनी सांगितले की,
कोल्हापूर येथील गणपती रोल्स फ्लोअर मिलचे मालक अश्विन सुरेश जैन व मॅनेजर प्रकाश माधवराव शेवाळे (दोघेही रा़ कोल्हापूर)यांनी संशयित जितूभाई ठक्करकडून २३ लाख ७८ हजार किलोपेक्षा अधिक धान्याची खरेदी केली़ या धान्याचे सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचे धनादेश जितूभाई ठक्कर यांच्या बनावट कंपन्यांच्या नावे दिले होते़ साईबाबा अॅग्रो, ग्रीनफिल्ड, शिवशक्ती या कंपन्यांच्या नावे असलेले हे धनादेश जितूभाईने वटवून पैसे काढले आहेत़
रेशन धान्य घोटाळ्याचे तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक छगन देवराज यांनी याबाबत जैन व शेवाळे या दोघांनाही वेळोवेळी चौकशीसाठी बोलावले़; मात्र कायदेशीर सल्लागाराला सोबत घेऊन येणाऱ्या या दोघांनाही तपासात असहकार्य करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे मिसर यांनी न्यायालयास सांगितले़, तर बचाव पक्षाचे वकील काळे यांनी धान्य खरेदी केल्यानंतर त्याचे रितसर धनादेश दिले असून ते कोणत्या बँकेचे वा ठिकाणचे असावे याबाबत बंधन नसते़
जैन व शेवाळे यांचा या घोटाळ्याशी संबंध नसून त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केल्यानेच पोेलिसांनी त्यांना आरोपी केल्याचा युक्तिवाद केला़ यावर मिसर यांनी मोक्कांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्णामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद नसल्याचे तसेच या जामीन अर्जापूर्वीच पोलिसांनी त्यांना आरोपी केल्याचे सांगितले़ या युक्तिवादानंतर न्यायाधीश जोशी यांनी १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़
रेशन धान्य घोटाळाप्रकरणी पोलिसांनी संशयित अरुण घोरपडे, संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले, धरमसिंग पटेल, जितेंद्र ठक्कर, पूनम होळकर, गुदामपाल संजय कचरू वामन यांच्यावर गुन्हा दाखल केला असून बुधवारी अश्विन जैन व प्रकाश शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने गुन्ह्णातील आरोपींची संख्या तेरा झाली आहे़ (प्रतिनिधी)