नाशिक रोडचे दोन्ही प्रेस १५ तारखेपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:54+5:302021-06-01T04:11:54+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने पुन्हा १५ जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केल्याने नाशिक रोड ...

नाशिक रोडचे दोन्ही प्रेस १५ तारखेपर्यंत बंद
कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने पुन्हा १५ जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केल्याने नाशिक रोड येथील भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय देखील १५ जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुद्रणालय व्यवस्थापनाने घेतला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार नाशिक रोडच्या भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय बंद ठेवण्याचा निर्णय मुद्रणालय व्यवस्थापनाने घेतला आहे. आयएसपी मजदूर संघाने प्रेस व्यवस्थापनाबरोबर बैठक घेतल्यानंतर प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.
प्रेसमधील कामगारांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून मजदूर संघाने दोन्ही प्रेस व्यवस्थापनाबरोबर बैठक घेतली. १५ एप्रिल ते ३१ मे अशी दीड महिना दोन्ही प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला होता. राज्य सरकारने १ जून ते १५ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवले असून, पंचवीस टक्के कामगार संख्या व अन्य अटींवर कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दोन्ही प्रेसमध्ये या नियमांनुसार काम सुरू करण्याबाबत मजदूर संघाची प्रेस व्यवस्थापनाबरोबर बैठक झाली. त्यानंतर प्रेस १५ जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. फक्त दिवस पाळीत इमरजन्सी काम सुरू ठेवण्यात येणार आहे. जेथे काम असेल त्या कामगारांना बोलवून घेतले जाणार आहे. शंभर टक्के प्रेस सुरू करण्यासाठी व्यवस्थापनाने जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे.