गावठी कट्टा बाळगणाऱ्या जळगावच्या दोघांना अटक
By Admin | Updated: August 8, 2016 23:37 IST2016-08-08T23:36:50+5:302016-08-08T23:37:28+5:30
अंबड-लिंकरोड : तीन दिवस पोलीस कोठडी

गावठी कट्टा बाळगणाऱ्या जळगावच्या दोघांना अटक
नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारात गावठी कट्टा हाताळताना गोळी सुटून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शहरातील खडकाळी परिसरात गावठी कट्टा व काडतुसे बाळगणाऱ्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ हे दोन्ही संशयित जळगाव जिल्ह्यातील असून, त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
खडकाळी सिग्नल परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे घेऊन दोन संशयित येणार असल्याची माहिती युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक एऩ एऩ मोहिते यांना मिळाली होती़ त्यानुसार रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता़ येथील देशी दारू दुकानाच्या समोर उभे असलेले संशयित दीपक साईदास राठोड (३५, रा. त्रिमूर्ती निवास, गजानन कॉलनी, चाळीसगाव, जि. जळगाव) व नीलेश भगवान चंदनशिव (३४, रा. संजय गांधीनगर, स्टेशन रोह, रवि कॉलेजसमोर, चाळीसगाव, जि. जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले़. या दोघा संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टा, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़ पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गावठी कट्टा कोठून खरेदी केला याची चौकशी करीत आहेत़ (प्रतिनिधी)