धनादेश न वटल्याने कर्जदारास ६ महिने कारावास
By Admin | Updated: November 17, 2015 22:52 IST2015-11-17T22:51:32+5:302015-11-17T22:52:16+5:30
पतसंस्था कर्जप्रकरण : रक्कम जमा करण्याचे आदेश

धनादेश न वटल्याने कर्जदारास ६ महिने कारावास
कळवण : नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था कळवण (नाशिक) या संस्थेच्या सप्तशृंगगड शाखेचे कर्जदार अहिल्याबाई जगन बर्डे, रा. सप्तशृंग गड यांनी वेळेवर कर्जफेड न केल्याने कर्जापोटी दिलेला धनादेश न वटता परत गेल्या प्रकरणी कळवण न्यायालयाने सहा महिने कारावास व धनादेशवरील रकमेच्या दुप्पट रक्कम न्यायालयात जमा करण्याची शिक्षा सुनावली आहे.
सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कळवण, शाखा सप्तशृंगगड येथून अहिल्याबाई जगन बर्डे यांनी ७ लाख रुपये इतके कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज थकबाकीत गेल्याने कर्जफेडीसाठी त्यांचे नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि., नाशिक, शाखा सप्तशृंगगड या बँकेच्या स्वत:च्या खात्याचा धनादेश दिलेला होता.
पतसंस्थेने वेळोवेळी कर्ज मुदत संपल्यानंतर वसुलीचा तगदा लावत नोटीस देण्यात आल्या होत्या; मात्र अहिल्याबाई बर्डे यांनी कर्ज भरण्याबाबत संस्थेला असहकार्याची भूमिका घेऊन टाळाटाळ केली. कर्जाची रक्कम भरण्याबाबत पतसंस्थेला धनादेश दिला होता. तोदेखील वटला नाही. म्हणून संस्थेने कर्जदाराला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कर्जदाराला नोटीस व समन्स दिले होते.
धनादेश बाउन्स झाल्याने संस्थेने अहिल्याबाई बर्डे यांच्या विरोधात अधिनियम कलम १३८ नुसार कळवण न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायालयाचा निकाल
सदर याचिकेची सुनावणी होऊन कर्जदार आहिल्याबाई बर्डे यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम पत्रकांचा कायदा कलम १३८ या शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवून ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी आणि धनादेशामध्ये नमूद रकमेच्या दुप्पट रकमे इतक्या द्रव्यदंडाची रक्कम न्यायालयात जमा करावी ,जमा न केल्यास आणखी एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा भोगावी असा निकाल कळवण न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस एन नाईक यांनी दिला आहे. सदर गुन्ह्यात फिर्यादी च्या वतीने अड के. बी. वाघ यांनी तर कर्जदाराच्या वतीने अड जी. बी. पाटील यांनी काम पाहिले.