‘महाबली’चा भल्या सकाळी उच्छाद

By Admin | Updated: October 13, 2015 22:58 IST2015-10-13T22:57:23+5:302015-10-13T22:58:50+5:30

राजकीय वरदहस्त : पोलीस बघ्याच्या भूमिकेत

Born in the morning of 'Mahabali' | ‘महाबली’चा भल्या सकाळी उच्छाद

‘महाबली’चा भल्या सकाळी उच्छाद

नाशिक : वेळ साधारणत: सकाळी सात ते आठच्या दरम्यानची असावी, शेकडो वाहनांचा ताफा कर्णकर्कश भोंगे वाजवत मुख्य रस्त्यावरून बेफामपणे धावत होता, कोणी वाहनाच्या खिडकीतून निम्मे अंग बाहेर काढलेले, तर काहींनी वाहनाच्या टपावरच बसकन मारलेली, मालमोटारीच्या बंपरवर जीवघेणी कसरतीत काही गुंतलेले, हातात भगवा ध्वज व तोंडातून नावालाच जयघोष, घोषणा मात्र न ऐकवणाऱ्या.. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी व वाहनांचा ताफा पाहून पादचाऱ्यांची उडालेली धावपळ....पण त्यांना ना धाक होता ना कसली भीती.
मंगळवारी नवरात्रोत्सवाची सुरुवात झाल्याने त्यानिमित्त पहाटेपासून देवीभक्त भाविकांची शहराच्या प्रमुख रस्त्यांवर बऱ्यापैकी वर्दळ असतानाच शहराच्या कॉलेजरोड, गंगापूररोड, शरणपूररोड या प्रमुख मार्गावरून स्वत:ला ‘महाबली’चे भक्त म्हणवून घेणाऱ्या व राज्यात सत्तांतर झाल्याने जणू काही ‘शिवशाही’ अवतरली अशा अविर्भावात रस्त्यावर उतरलेल्या या ‘युवा’ प्रतिष्ठानने प्रचंड धुडगूस घातला. रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने हाकतानाच जोर जोरात हॉर्न वाजविणे, तोंडात पिपाण्या धरून त्या मोठ्याने वाजविणे, अधून-मधून घोषणा देणे व प्रसंगी आडवे येणाऱ्यांचा पूर्वजांचा उद्धार करण्याचे काम बिनदिक्कतपणे करण्यात आले. शेकडो वाहने एकाच वेळी रस्त्यावर उतरल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा तर झालाच, परंतु काही ठिकाणी चौफुल्यांवर मुद्दामहून वाहने उभी करून स्वत:ला ‘महाबली’ म्हणवून घेणाऱ्यांनी रस्त्याने पायी जाणाऱ्यांची छेड काढण्याचाही प्रकार केला. भल्या सकाळी प्रचंड गोंगाटात नसत्या शक्तीचे प्रदर्शन करीत फिरणाऱ्यांना अटकाव करण्याची हिम्मत पोलीस यंत्रणेलाही झाली नाही. अर्थात तशीही ती होणे शक्यच नव्हते कारण सातपूरच्या श्रमिकनगरातून शेकडो वाहनांतून सप्तशृंगी देवीच्या दर्शनाचा ‘विक्रम’करण्यासाठी निघालेल्या या टोळक्यांचा हा उपद्रव होता. राज्यात झालेले सत्तांतर व भाजपाच्या मंत्री-पदाधिकाऱ्यांचा कथित आशीर्वाद असल्याचा संबंधितांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे पोलिसांचेही हात थिटे पडणे साहजिकच होते, फरक इतकाच होता ज्यांच्या नावे हा सारा उन्माद केला गेला, त्याचा पूर्वेतिहासही गुन्हेगारीचा असल्यामुळे चांगल्याची अपेक्षा ठेवणे ही नाशिककरांची चूकच म्हणावी लागेल.

Web Title: Born in the morning of 'Mahabali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.