मुद्रांक शुल्कातील कपातीने रियल इस्टेट क्षेत्राला बूस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:51+5:302020-12-05T04:21:51+5:30
नाशिक : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर घर खरेदीला चालना मिळाली असून, नाशिक जिल्ह्यात ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ...

मुद्रांक शुल्कातील कपातीने रियल इस्टेट क्षेत्राला बूस्ट
नाशिक : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर घर खरेदीला चालना मिळाली असून, नाशिक जिल्ह्यात ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सप्टेंबर,ऑक्टोबर व नोव्हेंबर या तिमाहीमध्ये ३७ हजार ४२२ दस्त नोंदणीच्या माध्यमातून शासनाला १७७ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी यामधून राज्याला मिळणाऱ्या महसुलात लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत तब्बल ६,८३८.७९ कोटी रुपयांचा फटका बसल्यानंतर बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये ३ टक्के, तर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी २ टक्के सूट देण्याचा निर्णय महसूल विभागाने ऑगस्टमध्ये घेतला आहे. त्यामुळे रियल इस्टेट बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त झाली असून, ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कातील तीन टक्के कपातीला लाभ घेता येणार आहे. त्यामुळे विवध बांधकाम प्रकल्पांवर घर खरेदीसाठी नाशिकरांसह लगतच्या शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचेही प्रयत्न सुरू आहेत. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात कपातीचा निर्णय घेतल्याने घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळाली आहे. राज्य सरकारने ऑगस्टमध्ये मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक ठिकाणी मुद्रांक शुल्क निम्म्यावर आणण्यात आले होते, तर उर्वरित शुल्काचा भार घर घेणाऱ्या ग्राहकांवर पडू नये, यासाठी ‘नरेडको’सारख्या संस्थांनी आवश्यक मुद्रांक शुल्क ग्राहकांच्या वतीने भरण्याचे निश्चित केले होते. त्याच धर्तीवर ३१ डिसेंबरपर्यंत नरेडकोच्या सभासदांच्या योजनेत नव्याने घर घेणाऱ्या ग्राहकांना शून्य मुद्रांक शुल्काची सवलत कायम राहणार आहे, तर त्यानंतरही जानेवारी ते मार्च या कालावधीत ग्राहकांना शासनाकडून मुद्रांक शुल्कात दोन टक्के कपातीला लाभ मिळणार असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे.
कोट-१
शसनाने ३१ डिसेंबर २०२०पर्यंत दस्त नोंदणी केल्यास ३ टक्के मुद्रांक शुल्कात सवलत घोषित केलेली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातील सहदुय्यम निबंधक वर्ग - २ नाशिक क्रमांक १ ते ७, सह दुय्यम निबंधक वर्ग-२ मालेगाव क्रमांक १, सहदुय्यम निबंधक मालेगाव क्रमांक ३, दुय्यम निबंधक श्रेणी-१, सिन्नर क्रमांक २ , दुय्यम निबंधक श्रेणी-१, निफाड, दुय्यम निबंधक श्रेणी- १, दिंडोरी व दुय्यम निबंधक श्रेणी-१, दुय्यम निबंधक श्रेणी-१, इगतपुरी दुय्यम निबंधक श्रेणी- १, येवला या कार्यालयामध्ये दर शनिवारी म्हणजे दिनांक ०५/१२/२०२०,दिनांक १२/१२ /२०२०, दिनांक १९/१२/२०२० व दिनांक २६/१२/२०२० या दिनांकास सुरू ठेवण्यात येणार आहे. - कैलास दवंगे, सहजिल्हा निबंधक, नाशिक????????
इन्फो-
मुद्रांक शुल्क कपातीनंतर दस्त नोंदणी
महिना दस्तनोंद महसूल (रुपयांमध्ये )
सप्टेंबर ११,४७२ ५३ कोटी ६५ लाख
ऑक्टोबर १३,३७२ ६८ कोटी २१ लाख
नोव्हेंबर १२,५७८ ५५ कोटी ७० लाख