आदिवासी शेतकऱ्यांसाठी आंबा लागवड एक वरदान

By Admin | Updated: December 26, 2016 01:40 IST2016-12-26T01:40:10+5:302016-12-26T01:40:34+5:30

इस्रायल पद्धतीने घेणार उत्पादन : आदिवासी शेतीतज्ज्ञांचा पुढाकार

A boon for mango cultivation for tribal farmers | आदिवासी शेतकऱ्यांसाठी आंबा लागवड एक वरदान

आदिवासी शेतकऱ्यांसाठी आंबा लागवड एक वरदान

 रामदास शिंदे पेठ
गेल्या शेकडो वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पिकांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी आता स्थानिक शेतीतज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. भात व नागली यासारख्या कमी उत्पादन देणाऱ्या पिकांना फाटा देत आता इस्रायलपद्धतीने आंबा लागवडीचे तंत्र विकसित करण्यात आदिवासी शेतकऱ्यांना यश आले आहे.
पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व इगतपुरीसारख्या तालुक्यात अजूनही पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने येथील शेतकरी भात व नागली ही पारंपरिक पिके घेत आहे. मात्र या पिकांवरील खर्च व उत्पादनाचा ताळमेळ बसत नसल्याने आदिवासी शेतकरी वर्षानुवर्षे आर्थिक खाईत लोटला जात असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. यावर उपाय म्हणून काही आदिवासी शेतकऱ्यांनी द्राक्ष व डाळींब सारखे पिके घेण्याचे धाडस केले; परंतु अधिक पाऊस व प्रतिकूल हवामान यामुळे शेतकऱ्यांनी बागा फुलण्याआधीच काढून टाकल्या.
नजीकच्या गुजरात राज्यातील धरमपूर, कपराडा व बलसाड हा परिसर आंब्याच्या उत्पादनात अग्रेसर समजला जातो. कोकणनंतर सर्वाधिक आंब्याचे उत्पादन गुजरातच्या याच भागात घेतले जाते. पेठ तालुक्यातील गावंधपाडा येथील शेतकरी यशवंत गावंढे यांनी नेमकी हीच बाब ओळखून पेठ तालुक्यात आंब्याची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्यास येथील शेतकरी विकसित होईल, यासाठी गावंढे यांनी पहिल्या शेतकरी बचतगटाची स्थापना केली. शासनाच्या कृषी विभाग, कृषितज्ज्ञ व कृषी संशोधक यांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन पेठ तालुक्यात इस्रायलपद्धतीने आंबा लागवड प्रयोग यशस्वी केला. अनेक कृषी संस्थांच्या प्रयत्नातून आदिवासी शेतकऱ्यांना अभ्यास दौरे घडवले. जैन उद्योगसमूह, आत्मा प्रकल्पसारख्या संस्थांनी पेठच्या शेतकऱ्यांना आंबा लागवडीचे तंत्र दिले. यामुळे तालुक्यात सद्य स्थितीत जवळपास शंभर एकरवर आंब्याची लागवड करण्यात आली असून, वर्षअखेर दोन हजार एकर क्षेत्रावर आंब्याची यशस्वी लागवड करून आगामी दोन वर्षांत शेतकऱ्यांना प्रतिएकर चार ते पाच लाख रु पये उत्पन्न मिळवून देण्याचा मानस यशवंत गावंढे यांनी व्यक्त केला आहे.
याकामी कृषी आयुक्त कैलास मोते, आत्मा प्रकल्पाचे संचालक अशोक कांबळे, उपसंचालक आप्पा वानखेडकर, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार आदिंनी वेळोवेळी शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन केले. शेतकरी बचतगटाचे यशवंत गावंढे, रामदास वाघेरे, अशोक गवळी, पद्माकर गवळी, देवराम गवळी, पंडित भोये, एकनाथ भोये, नामदेव मोहांडकर, मोहन पवार आदि शेतकऱ्यांच्या पुढाकाराने पेठ तालुका एका नव्या कृषी क्र ांतीचा साक्षीदार होऊ पाहत आहे.

Web Title: A boon for mango cultivation for tribal farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.