गोदाघाटावर बॉम्ब स्फोट

By Admin | Updated: May 31, 2014 00:46 IST2014-05-31T00:14:25+5:302014-05-31T00:46:42+5:30

अतिरेक्यांकडून बेछूटपणे गोळीबार

Bomb explosion at Godaghat | गोदाघाटावर बॉम्ब स्फोट

गोदाघाटावर बॉम्ब स्फोट

अतिरेक्यांकडून बेछूटपणे गोळीबार

पंचवटी : वेळ सकाळी सव्वा अकरा वाजता, ठिकाण गाडगे महाराज पुलाजवळील म्हसोबा महाराज पटांगण, चार अतिरेक्यांनी गणेशवाडीतील भाजीमंडईच्या पायरीवर अचानकपणे बॉम्ब स्फोट घडवून आणला व गोळीबार सुरू केला. रस्त्याने येजा करणार्‍या भाविकांची आणि नागरीकांची पळापळ झाली त्यातच चेंगराचेंगरी घडली आणि काहींनी जीव वाचविण्यासाठी थेट नदीपात्रात उडया मारल्या. अतिरेक्यांनी केलेल्या हल्लयात अनेक जण जखमी अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडलेले होते. बघता क्षणी घटनास्थळी शेकडो पोलीस कर्मचारी, सुरक्षारक्षक, होमगार्ड आणि सायरन वाजवित रूग्णवाहिका व जिल्हा प्रशासन दाखल झाले.
गंगाघाटावर अतिरेकी घुसल्याची चर्चा संपुर्ण शहरभर वार्‍यासारखी पसरली आणि शेकडो नागरीकांनी काय झाले हे बघण्यासाठी थेट गाडगे महाराज पटांगण गाठले आणि समोर सुरू असलेले मॉक ड्रिल बघून सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी गंगाघाटावरील गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या म्हसोबा महाराज पटांगणावर मॉक ड्रिल करण्यात आले. अचानकपणे अतिरेकी कारवाया झाल्या तर प्रशासनाने काय दखल घ्यावी, जखमींना मदतीसाठी काय करावे याचे धडे देण्यासाठी प्रात्यक्षिक करण्यात आले. तब्बल दिड तास चाललेल्या या मॉक ड्रिलमुळे अनेकांच्या मनात धास्ती भरली तर काहींनी बॉम्बस्फोट घडल्यानंतर काय परिस्थिती घडते हे मॉक ड्रिलच्या माध्यमातून अनुभवले.
मॉक ड्रिलसाठी सकाळी आठ वाजेपासून पोलीस, जिल्हा प्रशासन, मनपा, रुग्णालय प्रशासन सज्ज झाले होते. बॉम्ब स्फोट व गोळीबाराची घटना घडल्यानंतर काय करावे याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. त्यात जखमी झालेल्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून प्रथमोपचार केंद्रात नेणे, नदीपात्रात पडलेल्यांना बाहेर काढणे, घटना ज्याठिकाणी घडली तेथिल परिसर संपुर्ण खाली करणे, सदर घटनेची माहीती नियंत्रण कक्षाला कळविणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समन्वय ठेवणे हे या मॉक ड्रिलमधून स्पष्ठ करण्यात आले.
या मॉक ड्रिल प्रसंगी संचालक सचिव राज्य आपत्ती व्यवस्थापक आय. ए. कुंदन, जिल्हाधिकारी विलास पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सिंहस्थ अधिकारी महेश पाटील, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपआयुक्त अविनाश बारगळ, पंकज डहाणे, पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे, नरेंद्र पिंगळे, मनपाचे शहर अभियंता सुनिल खुने, आदिंसह मनपा आरोग्य विभाग, अग्निशामक दल, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, पोलीस, श्वान पथक, बॉम्बशोधक व नाशक सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Bomb explosion at Godaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.