बोलो-बोलो जय भीम...
By Admin | Updated: April 15, 2016 00:19 IST2016-04-15T00:14:47+5:302016-04-15T00:19:36+5:30
बोलो-बोलो जय भीम...

बोलो-बोलो जय भीम...
नाशिक : ‘बोलो बोलो जय भीम, जोर से बोलो जय भीम’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणा देत अमाप उत्साहात शेकडो भीमसैनिक निळे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. संध्याकाळी साडेपाच वाजता जुन्या नाशकातील मोठा राजवाडा येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मोठा राजवाडा येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त एन.अंबिका, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, नगरसेवक संजय साबळे, मीर मुख्तार अशरफी, शंकर बर्वे आदि मान्यवर उपस्थित होते. सहा वाजता मोठा राजवाडा येथून मिरवणुकीत सहभागी मंडळ चौकमंडई मिरवणूक मार्गाने निघाली. ढोल-ताशांचे विविध पथक सहभागी झाले होते. विल्होळी येथील सुखदेव आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी राजवाडा येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सलग अर्धा ते पाऊण तास लेजीम नृत्य करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक मिरवणूक मार्गाने निघालेल्या मिरवणुकीत मंडळांच्या चित्ररथांनी विविध सामाजिक विषयावरील चित्ररथांचे देखावे उभारले होते. निळ्या रंगांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत बाबासाहेबांचा जयघोष करीत आबालवृद्धांसह भीमसैनिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.