सांगवी सोसायटी निवडणुकीत बोगस मतदार
By Admin | Updated: January 20, 2017 00:12 IST2017-01-20T00:12:19+5:302017-01-20T00:12:29+5:30
देवळा : जिल्हा उपनिबंधकांकडे तक्र ार

सांगवी सोसायटी निवडणुकीत बोगस मतदार
उमराणे : देवळा तालुक्यातील सांगवी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होत असून, सोसायटीच्या मतदार यादीमध्ये ३२ बोगस मतदारांची नावे घेण्यात आली आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बेकायदेशीर मतदारांचा समावेश करण्यात आल्याची तक्रार सोसायटीचे विद्यमान संचालक अभिमन शेवाळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.
सांगवी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक येत्या २९ जानेवारी रोजी होत असून, या निवडणुकीच्या मतदार यादीत नव्याने ३२ सभासदांच्या नावे शेतीक्षेत्र दाखवून त्यांची नावे मतदार यादीत दाखल करण्यात आली आहेत. संबंधित सभासदांच्या शेतीक्षेत्राच्या नोंदी आॅक्टोबर व डिसेंबर या महिन्यात दाखविल्या आहेत. वैद्यनाथ समितीच्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये निवडणुकीपूर्वी किमान दोन वर्षांआधी सोसायटीचे सभासद होणे आवश्यक आहे, तरच त्या सभासदांचा मतदार यादीत समावेश करता येतो. सदर सभासदांना निवडणूक लागण्याआधी फक्त दोन महिन्यांच्या कालावधीत मतदार करून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बेकायदेशीर प्रकार केल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे. याशिवाय संस्थेचे चार वर्षांपासून लेखापरीक्षणही झालेले नाही. दोन वर्षांपूर्वी संस्थेचे सचिव गैरव्यवहारामुळे निलंबित झाले आहेत. सदर प्रकाराची चौकशी होण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधकांनी तालुका निबंधकांकडे याबाबत अहवाल मागविला आहे. दरम्यान, सहायक निबंधकांनी सातबारा, खाते उतारा व नमुना नंबर ६ वरील नोंदीची सत्यता पडताळण्यासाठी तहसीलदारांकडे अहवाल पाठविला आहे.
दरम्यान, निवडणूक तोंडावर असताना बोगस मतदारांचा प्रश्न उपस्थित झाल्याने जिल्हा उपनिबंधक काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)