महेश गुजराथी चांदवडकुठल्याही वैद्यकीय शाखेचे शिक्षण न घेतलेला एक तरुण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून रुग्णांच्या केसपेपरवर औषधे लिहून देत असल्याचा प्रकार बुधवारी (दि. १) सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.याबाबत एका रुग्णाने चांदवड येथील रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तुकाराम सोनवणे यांना कळविल्यानंतर ते रुग्णालयात येताच तोतया डॉक्टर पळून गेला. तुकाराम सोनवणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक जगदाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी होले, चांदवडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे यांना याबाबत कळविले. याबाबत वरिष्ठांनी कारवाईचे आश्वासन दिले. मात्र वैद्यकीय अधीक्षकांनी याबाबत कानावर हात ठेवले. चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेळके नामक व्यक्तीने रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तुकाराम सोनवणे यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत कोणीही डॉक्टर उपस्थित नाही तेथे एक मुलगा तपासणी कक्षात डॉक्टरांच्या खुर्चीवर बसून केसपेपरवर औषधे लिहून देत असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच तुकाराम सोनवणे तातडीने उपजिल्हा रुग्णालयात गेले. असता सीतारामनामक तरुण डॉक्टरांच्या खुर्चीत बसून रुग्णांना केसपेपरवर औषधे लिहून देत असल्याचे दिसून आले. त्यातील काही केसपेपर सोनवणे यांनी ताब्यात घेतले व वैद्यकीय अधीक्षक डॉ. बर्वे यांना दाखविले घटनेची आरडाओरड होत असताना संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. नाईक तेथे आले त्यांना सदर प्रकार विचारला असता सीतारामनामक व्यक्ती येथे असावा असे त्यांनी सांगितले. गर्दीचा फायदा घेत तोतया डॉ. सीताराम पळून गेला. रुग्णांंना नवीन केसपेपर देऊन डॉ.नाईक यांनी तपासणी केली. तोतया डॉक्टरने दिलेली औषधे व डॉ.नाईक यांनी तपासणी करून दिलेली औषधे यात तफावत आढळून आली. सदर गंभीर घटनेची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी होले यांना माहिती देण्यात आली. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान यासंदर्भात रुग्णालयाकडून पोलीसांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही. रुग्ण कल्याण समितीने लेखी तक्रार केल्यानंतर याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयात बोगस डॉक्टरं
By admin | Updated: March 2, 2017 01:25 IST