गांधीनगर परिसरात सापडला युवकाचा मृतदेह
By Admin | Updated: December 17, 2014 00:34 IST2014-12-17T00:32:52+5:302014-12-17T00:34:20+5:30
संशय : शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

गांधीनगर परिसरात सापडला युवकाचा मृतदेह
नाशिकरोड : गांधीनगर पाठीमागील जनता विद्यालय शाळेच्या आवारात आज सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह मिळून आला. मयत युवकाचा घातपात झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
गांधीनगर पाठीमागील मराठा विद्या प्रसारकाच्या जनता विद्यालयाचा वॉचमन सुनील गायकवाड हा आज सकाळी
साडेसहा वाजेच्या सुमारास शाळा उघडण्यासाठी आला होता. यावेळी शाळेच्या आवारातील ध्वजवंदनाच्या चबुतऱ्याजवळ एक अनोळखी
युवक मृतावस्थेत असल्याचे दिसून आले.
सदर घटनेची माहिती उपनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र मयत युवकाची ओळख पटू शकली नाही.
पोलिसांनी श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केल्यानंतर शाळेजवळील आगर टाकळी येथील मरीआई माता मंदिरापर्यंत श्वानाने मार्ग काढला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत युवकाचा घातपात झाल्याचा दाट संशय असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)