लोकमत न्यूज नेटवर्कसंदीप झिरवाळ :
पंचवटी - कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा व शेतमालाला हमी भाव द्यावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संप पुकारला होता. संप मिटताच लिलाव सुरू झाल्याने अडीच हजाराहून अधिक हमालांना शुक्रवारी नेहेमीप्रमाणे रोजगार मिळाला आणि हमालांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
तब्बल आठ दिवसांपासून बाजारसमितीतील शेतमालाचे व्यवहार बंद असल्याने हमाली व्यवासाय करणाऱ्या हमालांना हमाली काम मिळत नव्हते. दैनंदिन ४०० ते ५०० रूपये बाजारसमितीत हमाली व्यवसाय करून रोजंदारी मिळणाऱ्या हमालांवर उपासमारीची वेळ आलेली होती. संपुर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह हमाली व्यवासायावरच असल्याने व त्यातच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हमालांना रोजच्या मीठ मिरचीचा प्रश्न निर्माण झाला होता. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत जवळपास अडीच हजाराहून अधिक हमाल हमाली व्यवसाय करतात. आठवडयापासून बाजारसमितीतील लिलाव बंद असल्याने हमालांची आर्थिक कोंडी निर्माण झालेली होती. दोन तीन दिवस प्रतिक्षा केल्यानंतर बाजारसमितीतील व्यवहार सुरू न झाल्याने आर्थिक कचाटयात सापडलेल्या हमालांनी अखेर ज्या कंपनीत काम करायचे त्या कंपनीकडून थोडीफार रक्कम उचल घेतली होती. शुक्रवारच्या दिवशी बाजारसमितीत सकाळपासूनच पालेभाज्यांचे लिलाव सुरू झाल्याने हमाली व्यवसाय करणाऱ्यांनी आनंद व्यक्त करून पुर्वी प्रमाणेच बाजारसमितीत शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल खाली करणे, फळभाज्यांचे कॅरेट वाहणे, शेतमाल वाहनात भरणे, शेतमालाची पॅकिंग करणे आदि कामे करून रोजंदार सोडविला. आठ दिवसानंतर शेकडो हातांना पुन्हा पुर्वीप्रमाणेच काम मिळाल्याने व कामातून रोजंदार सुरू झाल्याने हमाली व्यवसाय करणाऱ्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. हमाली व्यवसाय बंद असल्याने शासनाने काहीतरी तोडगा काढेल व संप मिटेल अशाच प्रतिक्षेत हमाल व्यवसायिक काही दिवसांपासून प्रतिक्षा करीत होत. शुक्रवारी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीला आणल्याने हमालांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. शेकडो महिला व युवक हमाल बाजारसमितीत सकाळपासूनच आपापल्या कामात मग्न झालेले होते.