धारदार शस्त्राने वार करून मजुराचा खून
By Admin | Updated: January 10, 2016 23:48 IST2016-01-10T23:46:43+5:302016-01-10T23:48:21+5:30
अंबड औद्योगिक वसाहतीतील घटना : स्वरूप स्टील कंपनीमध्ये आढळला मृतदेह

धारदार शस्त्राने वार करून मजुराचा खून
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये मजुरी करणाऱ्या कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह अंबड औद्योगिक वसाहतीतील स्वरूप स्टील या बंद कंपनीमध्ये टाकून दिल्याचा प्रकार रविवारी (दि़१०) सायंकाळी उघडकीस आला़ मयत कामगाराचे नाव डेबा इसरल पावरा (वय ३०, रा़ अंबडगाव) असे असून, तो मूळचा धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील गुडकीचा रहिवासी आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील स्वरूप स्टील या बंद कंपनीत मजुरी करणाऱ्या एका कामगाराचा मृतदेह आढळून आला़ या मृतदेहाच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते़ याबाबत त्यांनी अंबड पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ मृतदेहाची तपासणी करीत असताना खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून तसेच इतर कामगारांनी मयत हा डेबा पावरा असल्याचे सांगितले़
अंबड पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला़ मयत पावराच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार असून, त्याचा खून कोणी व का केला याचा तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समीर वाघ करीत आहेत़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़