महिला बँक कर्मचाऱ्याचा भरदिवसा खून
By Admin | Updated: July 9, 2015 00:26 IST2015-07-09T00:17:58+5:302015-07-09T00:26:07+5:30
गंगापूर रोडवरील घटना : संशयित ताब्यात

महिला बँक कर्मचाऱ्याचा भरदिवसा खून
नाशिक : दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेत गत सोळा वर्षांपासून शिपाई पदावर काम करणाऱ्या वर्षा अरुण देशमुख (वय ४८) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बुधवारी (दि़८) गंगापूररोड शाखेत घडली़ सकाळी दहाच्या सुमारास बँक उघडत असताना त्यांच्यावर वार करण्यात आले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून देशमुख यांचे दीर सुरेश साहेबराव देशमुख यास गंगापूर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे़ दरम्यान हा खून संपत्तीच्या वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मूळच्या दिंडोरी येथील वर्षा अरुण देशमुख (४८, दत्तात्रय अपार्टमेंट फ्लॅट नंबर २, काठे गल्ली) या सोळा वर्षांपासून दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेत शिपाई पदावर काम करीत असून सद्यस्थितीत बँकेच्या गंगापूररोडवरील पाटील संकुल शाखेत कार्यरत होत्या़
पती अरुण देशमुख यांचे २०१३ मध्ये निधन झाल्याने तसेच मुलबाळ नसल्याने त्या काठे गल्लीतील बहिणीकडे राहत होत्या़ सकाळी दहा वाजेच्या सुमारास नेहेमीप्रमाणे बँक उघडण्यासाठी गेल्या होत्या़ बँकेचे बाहेरील गेट उघडल्यानंतर आतील दरवाजा उघडत असताना त्यांच्यावर अज्ञान व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून पलायन केले़
बँकेच्या शेजारीच असलेल्या श्रीनिवास वस्त्रालयमधील कामगारांनी देशमुख या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच उपचारासाठी तत्काळ जवळील नेर्लीकर हॉस्पिटल, श्री गुरुजी रुग्णालय व त्यानंतर सुमन हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान वर्षा देशमुख व त्यांचे दीर सुरेश साहेबराव देशमुख यांच्यामध्ये जमिनीवरून वाद होता़ येत्या दोन-तीन दिवसात न्यायालयात त्याबाबत निकालही होणार होता़ या प्रकरणी देशमुख यांच्या बहिणीचा मुलगा शोणेत मिलिंद जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)