भगूर : लहवित गावात आंबडवाडी येथे पुन्हा गायकर यांच्या घरांवर मंगळवारी दुपारी दगडफेक झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.लहवित गावामध्ये धुळवडीपासून घरांवर दगडफेक होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दगड नेमके कोण फेकतात याचा उलगडा होत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. गावामध्ये दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त लावून सुद्धा दगडफेकीचा प्रकार सुरूच आहे. यामुळे काही ग्रामस्थांनी आपल्या नातेवाइकांना इतर नातेवाइकांच्या घरी पाठविले आहे. सुरेश धोंडीराम गायकर, ज्ञानेश्वर कोंडाजी गायकर, निवृत्ती पुंजाजी गायकर, पुंजाबाई शिवराम पाळदे यांच्या घरांवर मंगळवारी दुपारी अचानक दगडफेक झाल्याने छताच्या सिमेंटच्या पत्र्याचे नुकसान झाले आहे. या दगडफेकीत हरी खराटे यांच्या पायाला जखम झाली आहे. दगडफेक सुरू झाल्यानंतर घरातील सर्वजण बाहेर सुरक्षित स्थळी येऊन उभे राहतात. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय बोराडे, रवींद्र काकडे, सुरेश पाळंदे, रमेश डोन्नर यांना गावामध्ये बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहे.
लहवितला पुन्हा घरांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:54 AM