घोटीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन जण जखमी.
By Admin | Updated: January 21, 2017 12:27 IST2017-01-21T12:27:44+5:302017-01-21T12:27:44+5:30
घोटी शहरातील बाजार समितीच्या मागील वसाहतीत आज सकाळी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाले.

घोटीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन जण जखमी.
>ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. २१ - घोटी शहरातील बाजार समितीच्या मागील वसाहतीत आज सकाळी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून याबाबत घोटी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
घोटी शहरातील बाजार समितीच्या मागील बाजूस असणाऱ्या नागरी वसाहतीत अनेक कामगार भाडेतत्वावर राहतात.यात दगडू सोनवणे यांच्या चाळीत जिंदाल कारखान्यात काम करणारे चंद्रप्रकाश सूर्यबली चौहान हे आपल्या कुटुंबासह भाडेतत्वावर राहतात.आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी उठले असता त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन गॅस चालू करण्याचा प्रयत्न केला असता,गॅस गळती होऊन गॅस संपूर्ण घरात पसरला व सिलेंडरने पेट घेतला. दरम्यान हा प्रकार घडल्याने चौहान यांनी जोरात आरडाओरड करीत आपल्या पत्नीला व मुलांना घराबाहेर जाण्यास सांगितले.त्यानंतर झालेल्या स्फोटात स्वयंपाक घरातील किचन ओटा, दरवाजा,खिडक्या कपडे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात चंद्रप्रकाश चौहान हे भाजल्याने जखमी झाले.दरम्यान या कुटुंबाचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी आलेले घरमालक अजय सोनवणे हे भाजल्याने जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील,उपनिरीक्षक संदीप शिंदे,प्रीतम लोखंडे,शेलार यांच्यासह गॅस वितरक जयप्रकाश नागरे, प्रशांत जाधव आदींनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.