मायलेकावर काळाचा घाला
By Admin | Updated: January 5, 2016 00:03 IST2016-01-05T00:02:40+5:302016-01-05T00:03:22+5:30
खेतवाणी लॉन्सजवळील घटना : ट्रकचालकास अटक

मायलेकावर काळाचा घाला
सिडको : नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात असलेल्या मायलेकास भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात मानकुंवरबाई बोथरा (६०) व त्यांचा मुलगा विवेक बोथरा (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
गंगापूररोड परिसरातील आकाशवाणी केंद्राजवळ राहणाऱ्या मानकुंवरबाई बोथरा व त्यांचा मुलगा विवेक हे सिडकोतील त्यांचे नातेवाईक मनसुखलाल छोरिया यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी दुचाकीने (एमएच १५, बीयू/४५९९) सिडकोकडे जात होते. उंटवाडीरोडवरील खेतवाणी लॉन्ससमोर बोथरा मायलेक रस्त्याच्या कडेला उभे असतानाच सिटी सेंटर मॉलकडून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने (एमएच ०४, डीके ८३५६) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बोथरा मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या धडकेत दुचाकीवर बसलेल्या मानकुंवरबाई बोथरा (६०) व त्यांचा मुलगा विवेक बोथरा (३५) या दोघाही मायलेकाच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर अपघातानंतर ट्रकचालक फरार होत असतानाच नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून शिवशक्ती चौकात ट्रकला पकडले़ या प्रकरणात मात्र ट्रकचालक फरार झाला होता़ दरम्यान, या अपघातानंतर खेतवाणी लॉन्ससमोर सुमारे अर्धातास वाहतूक खोळंबली होती. मायलेकाच्या या दुर्दैवी अपघातामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विवेकचे किराणा दुकान असून, त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी मायलेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छोट्या सार्थकने आपल्या वडिलांना अग्निडाग देताच उपस्थितांची मने हेलावली.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.