घोरपडेंच्या मालमत्तेवरून काळ्याबाजाराची व्याप्ती
By Admin | Updated: November 11, 2015 23:31 IST2015-11-11T23:31:03+5:302015-11-11T23:31:51+5:30
रेशन दुकानदार, पुरवठा यंत्रणाही आरोपीच्या पिंजऱ्यात

घोरपडेंच्या मालमत्तेवरून काळ्याबाजाराची व्याप्ती
नाशिक : मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या संपत घोरपडे याच्या सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून रेशनच्या धान्य काळ्याबाजाराची व्याप्ती निदर्शनास येत असल्याने घोरपडे याच्याबरोबरच जिल्ह्यातील रेशन दुकाने व त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेली पुरवठा यंत्रणाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली आहे. पुरवठा विभाग, रेशन दुकानदार व काळाबाजार करणाऱ्यांच्या साखळीतूनच हे सारे शक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
नाशिक जिल्ह्यातील रेशनच्या काळाबाजारात घोरपडे व चौधरी अशा दोन टोळ्या असून, या टोळ्यांच्या परस्परविरुद्ध कारवायांतूनच आजवर रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस आल्याची उदाहरणे आहेत. त्यातून दोन्ही टोळ्यांवर पोलिसांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत; परंतु त्यांची सुनावणी प्रलंबित असल्याने गुन्हेगार मोकाट आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायातूनच संबंधितांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याचे संपत घोरपडे याच्या जप्त मालमत्तेवरून स्पष्ट झाले आहे.
त्याचबरोबर या साऱ्या यंत्रणेवर नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या पुरवठा निरीक्षकापासून ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचेही सोयिस्कर दुर्लक्ष त्यास कारणीभूत आहे. त्यामुळे एकटा घोरपडे रेशनच्या धान्य काळ्याबाजारातून कोट्यवधीची मालमत्ता गोळा करू शकतो, तर या साखळीत सहभागी असलेले रेशन दुकानदार, पुरवठा यंत्रणा किती कोटीची भागीदार असेल यावर आता चर्चा झडू लागली आहे. घोरपडे याच्या दृश्य स्वरूपातील मालमत्तेवर टाच आणण्यात आलेली असली तरी, त्यातील न दिसणारी संपत्ती किती असेल, याविषयी अंदाज बांधणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. घोरपडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्यामुळे या धंद्यात गुंतलेल्यांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)