काळा दिवस : दुर्घटनेला आज बारा वर्षे पूर्ण
By Admin | Updated: August 27, 2015 00:16 IST2015-08-27T00:16:37+5:302015-08-27T00:16:37+5:30
चेंगराचेंगरीची कारणमीमांसा एक तपानंतरही गुलदस्त्यात

काळा दिवस : दुर्घटनेला आज बारा वर्षे पूर्ण
नाशिक : बरोबर १२ वर्षांपूर्वी दि. २७ आॅगस्ट २००३ रोजी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापर्वणीला सरदार चौकात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून ३३ भाविकांचा बळी गेला होता. आज एक तपानंतरही या दुर्घटनेची कारणमीमांसा गुलदस्त्यातच आहे.
बारा वर्षांपूर्वी नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी दि. १२ आणि १७ आॅगस्ट रोजी पहिली पर्वणी पार पडल्यानंतर दि. २७ आॅगस्ट २००३ रोजी द्वितीय महापर्वणी नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी होती. पहिल्या पर्वणीचा अनुभव लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने द्वितीय महापर्वणीला गर्दीच्या दृष्टीने नियोजन केले. परंतु नाशिक येथे महापर्वणीला साधू-महंतांच्या शाही मिरवणुकीला गालबोट लागले आणि सरदार चौकात चेंगराचेंगरीची दुर्घटना होऊन ३३ भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला गुरुवार, दि. २७ आॅगस्ट २०१५ रोजी बरोबर बारा वर्षे पूर्ण होत आहेत. तमाम नाशिककर ही दु:खद आणि अंगावर शहारे आणणारी घटना आजही विसरू शकलेले नाहीत. या दुर्घटनेची शासनाने रमणी आयोगामार्फत चौकशी केली. रमणी आयोगाने चौकशी अहवालात काही शिफारशी केल्या होत्या. त्यापैकी एक सरदार चौकाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने रुंदीकरणाचा प्रस्ताव महासभा आणि स्थायी समितीसमोर ठेवलाही होता; परंतु दोहोंनीही सदरचा प्रस्ताव फेटाळून लावला. शाही मिरवणुकीत एका महंताने चांदीची नाणी उधळल्याने ती वेचण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आणि चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जाते. परंतु सत्य परिस्थितीचा आजही छडा लागू शकलेला नाही आणि रमणी आयोगाने सुचविलेल्या शिफारशीही महापालिकेसह पोलीस प्रशासनाने बासनात गुंडाळून ठेवल्या. गेल्या बारा वर्षांत या दुर्घटनेची कारणमीमांसाही कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे कारणमीमांसा एक तपानंतरही गुलदस्त्यातच आहे. (प्रतिनिधी)