मेळा बसस्थानकात काला-पिला जुगार
By Admin | Updated: November 19, 2015 23:14 IST2015-11-19T23:13:53+5:302015-11-19T23:14:42+5:30
लुटीचे प्रकार : रात्रीच्या सुमारास गैरप्रकार

मेळा बसस्थानकात काला-पिला जुगार
नाशिक : येथील मेळा बसस्थानक आणि नवीन बसस्थानकाला जोडणाऱ्या मार्गावर सकाळपासूनच काला-पिला जुगार राजरोसपणे खेळला जात आहे. या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जाळ्यात ओढले जात असून, त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार होत आहे.
मेळा बसस्थापक परिसरातून लांबपल्ल्याच्या पुणे, तसेच त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बसेस सोडल्या जातात. तसेच अनेक प्रवासी हे नवीन बसस्थानकाकडे जाण्यासाठी मेळा स्थानकाच्या मार्गाचा वापर करतात. परंतू पूर्वीप्रमाणेच या मार्गावर आता जुगाऱ्यांचा डाव रंगलेला असतो. त्यामुळे या मार्गावरून जाणे जिकिरीचे झाले आहे.
काला-पिला हा जुगार खेळण्यासाठी त्यांच्यातीलच काही लोक गर्दी करतात आणि एखादे सावज गाठून त्यास खेळण्यास प्रवृत्त करतात. यासाठी नियोजनबद्ध खेळी केली जाते. त्यात बिचाऱ्या प्रवाशांना लुबाडले जाते. कित्येक प्रवाशांना तर खिशातील पूर्ण रक्कम डावावर लावल्याशिवाय हलूही दिले जात नसल्याचे बोलले जाते.
केवळ जुगारच नव्हे, तर चोरट्यांचादेखील हा कट्टा बनलेला आहे. दिवसाढवळ्या जुगारांचे राज्य तर रात्रीच्या सुमारास भुरटे चोर आणि लूटमार करणाऱ्यांच्या टोळ्या येथे कार्यरत असतात. रात्री या मार्गावर पथदीप नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांना लुटत आहेत. तर कित्येकदा मारहाणदेखील केली जात असल्याचे समजते. केवळ चोरटेच नव्हे तर चोरीच्या दुचाकी याच ठिकाणी आणून त्याची विल्हेवाट लावली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे बसस्थानक परिसर हा चोर, लुटारू आणि गुंडांचा परिसर बनला आहे. ही बाब पोलिसांना अनेकदा कळविण्यात आलेली आहे. मात्र तात्पुरती कारवाई केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, मेळास्थानक ते नवीन सीबीएस हा मार्ग कॉँक्रिटीकरण करून त्यावर पथदीप बसविण्यात यावे, अशी मागणी एस.टी. महामंडळाकडे करण्यात आलेली आहे. येथे महामंडळाच्या बसेस अंधारातच उभ्या राहतात. त्याचा फायदा घेऊन समाजातील काही समाजविघातक लोक गैरप्रकार करीत असल्याने वेळीच त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)