भाजपाची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू?
By Admin | Updated: February 26, 2017 00:41 IST2017-02-26T00:40:52+5:302017-02-26T00:41:06+5:30
सत्ता समीकरण : अपक्षांनाही गोंजारण्याचा प्रयत्न

भाजपाची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू?
नाशिक : जिल्हा परिषदेत निवडणूक निकालानंतर स्पष्ट बहुमत कोणत्याही एका राजकीय पक्षाला न मिळाल्याने आता आघाडी आणि युतीचे पर्याय शोधण्याचे काम भारतीय जनता पक्ष व शिवसेनेकडून सुरू झाले आहे. भाजपाने राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत चर्चेची तयारी सुरू केल्याचे समजते. तर तिकडे शिवसेना नेत्यांनीही मातोश्रीचा कल पाहून प्रसंगी भाजपाशी काडीमोड झाला, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचे पर्याय खुले ठेवले आहेत. शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी अपक्षांना सोबत घेण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केले आहे. भाजपाकडून निवडून आलेल्या एका अनुभवी जिल्हा परिषद सदस्याने शनिवारी (दि.२५) निफाड तालुक्यातून निवडून आलेल्या एका अपक्षासोबत चर्चा केल्याचे समजते. भाजपाकडून निवडून आलेल्या १५ सदस्यांपैकी पाच सदस्य पुरुष, तर दहा महिला जिल्हा परिषद सदस्या निवडून आल्या आहेत. या पाच पुरुष सदस्यांमध्ये मालेगावमधून जगन्नाथ हिरे व समाधान हिरे, चांदवडमधून डॉ. आत्माराम कुंभार्डे, निफाडमधून डी. के. जगताप व बागलाणमधून कान्हू गायकवाड यांचा समावेश आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातून सातपैकी पाच जिल्हा परिषद सदस्य भाजपाकडून निवडून आणून हिरे बंधूंनी सरशी साधली असून, या पाचपैकी एका तरी सदस्याला सभापतिपद मिळवून देण्यासाठी ते आता प्रयत्नशील आहेत. तिकडे देवळ्यातून निवडून आलेल्या धनश्री केदा अहेर यांचे पती केदा अहेर भाजपाकडूनच तूर्तास जिल्हा परिषदेत सभापती असल्याने त्यांचाही दावा कायम आहे. देवळा मतदारसंघातीलच यापूर्वीही जिल्हा परिषदेत निवडून आलेले सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनीही दावा सांगितला आहे. तिकडे सिन्नरमधून माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे निवडून आल्याने पुढील विधानसभेची लढत लक्षात घेऊन शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपाकडून सिन्नरला पद दिले जाऊ शकते. भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत युती झालीच नाही तर पर्याय म्हणून आतापासूनच राष्ट्रवादी व कॉँग्रेससह अपक्षांसोबत चर्चा सुरू ठेवल्याचे कळते. (प्रतिनिधी)