भाजपाचे यश... उम्मीदसे दुगना !

By Admin | Updated: February 26, 2017 00:16 IST2017-02-26T00:15:52+5:302017-02-26T00:16:08+5:30

भाजपाचे यश... उम्मीदसे दुगना !

BJP's success ... the expectations doubled! | भाजपाचे यश... उम्मीदसे दुगना !

भाजपाचे यश... उम्मीदसे दुगना !

नाशिक : दरवेळी जेमतेम काठावर पास होणारा विद्यार्थी यंदा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार, ही भावना सुखावणारी ठरू शकते. परंतु केवळ चांगले गुणच नाही तर ‘डिस्टिंगशन’मध्ये असा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यासह साऱ्यांना धक्का बसावा, अगदी अशीच अवस्था भाजपासहीत सर्वांची झाली आहे.  आजपर्यंत भाजपा केवळ पडण्याच्याच भूमिकेत राहिला आहे. त्यामुळे यंदा भाजपाला अनुकूल वातावरण असले तरी किती जेमतेम तीस-पस्तीस जागा मिळतील, त्या तुलनेत शिवसेना मात्र अधिक जागा मिळवेल हा सार्वत्रिक अंदाज खोटा ठरविणारा हा निकाल आहे.  केंद्र आणि राज्यातील यशानंतर भाजपाचा यंदाच्या मनपा निवडणुकीतील पवित्रा निश्चितच आक्रमक असला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वर्षात मराठवाड्यासाठी सोडावे लागलेले पाणी, आरोग्य विद्यापीठाच्या विभाजनाचा प्रस्ताव आणि विकासकांची झालेली अडचण या विषयावर सर्वच पक्षांनी भाजपाची कोंडी केली होती. त्यातच नोटांबदीचा विषय पुढे आला आणि त्यावरूनही भाजपाला लक्ष बनविले गेले. हे मुद्दे आपल्या पथ्यावर पडेल असे साऱ्याच विरोधी पक्षांना वाटत होते. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारी राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात दिलेला प्रवेश हा मुद्दा अडचणीचा ठरला. भाजपाच्या विरोधातील या चर्चांमुळे विरोधकांना उकळ्या फुटणे स्वाभाविक असले तरी भाजपाने मात्र नियोजनावर भर दिला.  मुळात पक्षात आयाराम आणतांनाही कुठे कोण प्रभावी ठरेल त्यालाच प्रवेश देण्याचे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचे धोरण अचूक ठरले. शिवसेनेच्या नगरसेवक ‘भरती’शी भाजपाने स्पर्धा केली नाही. उलट अन्य पक्षांतील नगरसेवकांना प्रवेश नाकारण्याचे धाडस या पक्षाने केले. प्रसंगी ज्यांच्याशी दोन हात केले अशा विरोधकालाही पक्षात स्थान देण्याच्या निर्णयामुळे सत्ता आणण्याच्या दृष्टीनेच पावले पडत होती. भौगोलिकदृष्ट्या ज्या प्रभागात सक्षम उमेदवारांचा समतोल साधला जाईल, अशी व्यवस्था करताना दोन जुने आणि दोन नवे अशी प्रारंभिक रचना होती. जो उमेदवार अन्य तिघांना आपल्यासमवेत निवडून आणेल, अशांना प्राधान्य देण्यात आले. पक्षातील अनेक निष्ठावंत नाराज झाले असले तरी व्यावहारिक दृष्ट्या निर्णय घेतले गेले.  उमेदवारीतील गोंधळ, घराणेशाही डावे उजवे त्यातच तिकीट विक्रीचे व्हायरल झालेले व्हिडिओ हे सर्वच निवडणुकीत भाजपाला अडचणीत आणणारे ठरत होते. त्यातच पक्षात तीन आमदार असले तरी विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतील असा स्थानिक वडीलधारी ज्येष्ठ नेता नसल्याने साराच गोंधळ होता. त्यातल्या त्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी समन्वयाची भूमिका घेत पक्षातील वाद वाढू दिले नाहीत. तसेच विरोधकांना उत्तर दिले.
निवडणुकीतील सरकारशी संबंधित वादग्रस्त मुद्याचा फटका भाजपाला बसणार असे चित्र असले तरी या साऱ्याच प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेवटच्या सभेत उत्तर दिले आणि थेट नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर नूर पालटला. आमदारांची आपसातील स्पर्धा आणि सत्ता आणल्यानंतर परफॉर्मन्सवर आधारित राज्यमंत्री मंडळात मिळणारी संधी त्यातच मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी हे सर्व पक्षांतर्गत वादाला पूरक असले तरी या वादात मतदार मात्र फसला नाही. अनेक अंतर्गत विखारी प्रचारानंतरही मतदारांना जे वाटले तेच त्यांनी केले आणि भरभरून मतदान केले. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's success ... the expectations doubled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.