नाशिकच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी
By Admin | Updated: March 14, 2017 23:39 IST2017-03-14T23:39:35+5:302017-03-14T23:39:58+5:30
नाशिक : महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर- उपमहापौरपदाची निवड बिनविरोध झाली आहे.

नाशिकच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी
नाशिक : महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर- उपमहापौरपदाची निवड बिनविरोध झाली आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांची महापौरपदी, तर पहिल्यांदाच सभागृहात पाऊल ठेवणारे भाजपाचेच प्रथमेश गिते यांची उपमहापौरपदी निवड झाली. महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रमण्यम् राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता महापौर - उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रारंभी महापौरपदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. महापौरपदासाठी भाजपाच्या रंजना भानसी, तर कॉँग्रेसच्या आशा तडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला असता यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह आमदारांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या गटनेत्यांबरोबर चर्चा करत बिनविरोध निवडीची विनंती केली.
त्यानुसार, कॉँग्रेसच्या आशा तडवी यांनी अर्ज मागे घेतल्याने महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी यांची बिनविरोध निवड पीठासन अधिकाऱ्यांनी घोषित केली. यावेळी सर्व सदस्यांनी बाके वाजवून भानसी यांचे अभिनंदन केले. त्यानंतर उपमहापौरपदासाठी निवडप्रक्रिया राबविण्यात आली. उपमहापौरपदासाठी भाजपाचे प्रथमेश गिते आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुषमा पगारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने प्रथमेश गिते यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, पीठासन अधिकारी बालसुब्रमण्यम् राधाकृष्णन् यांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर- उपमहापौरपदाची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ६६ नगरसेवक असून, त्याखालोखाल शिवसेना ३५, कॉँग्रेस ६, राष्ट्रवादी ६, मनसे ५, अपक्ष ३ आणि रिपाइं १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपाच सत्तारूढ होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदान झाल्यास सेना-मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका यापूर्वीच जाहीर केली होती. त्यामुळे मंगळवारी (दि.१४) केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली आणि महापालिकेच्या १५ व्या महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.