भाजपाची योजना; ‘मुख्यमंत्री मित्र’
By Admin | Updated: April 10, 2016 23:54 IST2016-04-10T22:46:44+5:302016-04-10T23:54:36+5:30
उपक्रम : प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मिळणार संधी

भाजपाची योजना; ‘मुख्यमंत्री मित्र’
नाशिक : राज्यात शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी होते किंवा नाही आणि त्याबाबत जनसमान्यातील मत काय, याची पडताळणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री मित्र योजना राबविण्यात येणार आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये भाजपा प्रदेश कार्यकारिणी समितीच्या बैठकीत वॉर रूम या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. त्यात नमोपेक्षा देवेंद्रचे समर्थक वाढल्याची तुलना करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यानेच ही योजना आखली आहे. त्यामुळे या योजनेविषयी सध्या भाजपामध्येच उत्कंठा आहे.भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला असून समन्वयक म्हणून तेच काम करीत आहेत. राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर असलेली यंत्रणा योजनांचा लाभ कितपत तळागाळात आणि लाभपात्र व्यक्तींपर्यंत पोहोचवते, याविषयी शंका आहे. त्यामुळेच ही योजना राबविण्याची तयारी करण्यात आली. त्यासाठी राज्यभरातून अर्ज मागविण्यात आले असून एकूण २८०० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती शालिनी यांनी दिली आहे.
ही भाजपाला समांतर यंत्रणा असल्याने सारेच याविषयी शंका घेत असले तरी श्वेता शालिनी यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. ही पर्यायी नव्हे तर पक्षाला पूरक यंत्रणा आहे. शेवटी या यंत्रणेकडून पक्षाचेच काम केले जाणार आहे. याच पद्धतीचे काम शेतकरी मित्र आणि अन्य अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर ही योजना असणार आहे. त्यासाठी मागविलेल्या अर्जातून स्वयंसेवक निवडले जाणार आहे. केवळ पक्षातील नव्हे तर पक्षाबाहेरील हितचिंतकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. मुलाखती घेऊन आणि निकषात बसणाऱ्यांनाच यात सहभागी करून घेतले जाणार आहे. मुख्यत्वे ज्यांना राजकीय पदांची किंवा सत्तेची अभिलाषा नाही, अशा निवृत्त पोलीस अधिकारी किंवा सैनिकी अधिकाऱ्यांसारख्यांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात यासंदर्भात मुलाखती सुरू झाल्या असून येत्या दोन ते अडीच महिन्यात मुख्यमंत्री योजना कार्यान्वित होणार असल्याचे शालिनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)