भाजपाचे ‘नो सेलिब्रेशन...
By Admin | Updated: October 31, 2015 23:10 IST2015-10-31T23:05:04+5:302015-10-31T23:10:14+5:30
’संपर्क अभियान : मित्रपक्ष शिवसेना मात्र रुसलेलाच

भाजपाचे ‘नो सेलिब्रेशन...
नाशिक : राज्यातील भाजपा आणि सेनेच्या सत्तेला एक वर्षपूर्ण झाले असताना शनिवारी भाजपाच्या वतीने कोणतेही नो सेलिब्रेशन, ओन्ली कम्युनिकेशन, अशी मोहीम राबविण्यात आली आणि सरकारने वर्षभरात घेतलेल्या निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मात्र या सर्वांपासून दूर राहण्याचे पसंत केले.
राज्यातील सेना-भाजपा युतीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले. नाशिकमध्ये तर महागाई रथ काढण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही भाजपाला लक्ष्य केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपादेखील वाजत गाजत वर्षपूर्ती साजरी करेल, अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. सकाळी वसंत स्मृती येथे भाजपाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या वतीने गाडगे महाराज चौकापर्यंत फेरी काढून नागरिकांना प्रदेश भाजपाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पत्रके वितरीत करण्यात आली. सरकारने एका वर्षात घेतलेल्या निर्णयांची माहिती यावेळी देण्यात आली. सुरेश पाटील, सुजाता करजगीकर, प्रकाश दीक्षित, अरुण शेंदुर्णीकर अजिंक्य साने, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्यात सहभाग घेतला. पक्षादेशाप्रमाणे भाजपाने ‘नो सेलिब्रेशन, ओन्ली कम्युुनिकेशन’ असा उपक्रम राबविल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र वर्षपूर्ती कार्यक्रमापासून दूर राहणेच पसंत केले. भाजपाशी सुरू असलेल्या वादाची किनार त्याला होती.