मनपा पोटनिवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले
By Admin | Updated: August 30, 2016 00:19 IST2016-08-30T00:13:18+5:302016-08-30T00:19:50+5:30
मनसे, रा.कॉँ.चा धुव्वा : शिवसेना, कॉँग्रेसची झुंज

मनपा पोटनिवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या दोन प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले. प्रभाग क्रमांक ३५ मध्ये मंदा ढिकले, तर प्रभाग ३६ मध्ये सुनंदा मोरे या दोन्ही भाजपा उमेदवारांनी विजयाला गवसणी घातली. महापालिकेत सत्तारूढ मनसेच्या ताब्यात असलेल्या या दोन्ही जागा भाजपाने आपल्या ताब्यात घेतल्या. निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला, तर शिवसेना व कॉँग्रेस उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर कडवी लढत दिली.
मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी मतदान केल्याने मनसेच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांनी दोघांचे सदस्यत्व रद्द ठरविले होते. या दोहोंच्या रिक्त जागांसाठी रविवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. प्रभाग ३५ मध्ये ४७.७० टक्के तर प्रभाग ३६ मध्ये ५६.६२ टक्के मतदान झाले होते. दोन्ही प्रभागांची मतमोजणी सोमवारी (दि.२९) झाली. यावेळी प्रभाग ३५ मध्ये भाजपाच्या उमेदवार मंदा ढिकले या १९८ मताधिक्याने, तर प्रभाग ३६ मध्ये भाजपाच्याच सुनंदा मोरे या ४९१ मताधिक्याने निवडून आल्या. प्रभाग ३५ मध्ये मंदा ढिकले यांना १९४६, सेनेच्या वृषाली नाठे यांना १७४८, मनसेच्या शांताबाई शेजवळ यांना ९९१, तर राष्ट्रवादीच्या वंदना चाळीसगावकर यांना २६७ मते पडली. प्रभाग ३६ मध्ये भाजपाच्या सुनंदा मोरे यांना १९३७, कॉँग्रेसचे शशिकांत उन्हवणे यांना १४४६, सेनेचे सुनील शेलार (१३९७) आणि मनसेचे प्रवीण पवार यांना ७२० याप्रमाणे मते मिळाली. दोन्ही प्रभागांत १४२ मतदारांनी कुणाही उमेदवाराला पसंती दर्शविली नाही. भाजपाने मिळविलेला हा विजय फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयाची नांदी मानली जात असल्याने भाजपामध्ये उत्साहाला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)