भाजपाचे निवडणूक सिंचन
By Admin | Updated: September 4, 2016 01:27 IST2016-09-04T01:20:52+5:302016-09-04T01:27:18+5:30
गंगापूर धरणावर जलपूजन : गोदामाईला पालिका विजयाचे साकडे

भाजपाचे निवडणूक सिंचन
नाशिक : गंगापूर धरणात ९० टक्क्यांवर जलसाठा जाऊन पोहोचल्यानंतर शहराच्या प्रथम नागरिकाने अर्थात महापौराने जलपूजन करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. यंदा ६६ टक्के जलसाठा असतानाच महापौर अशोक मुर्तडक यांनी १५ जुलैलाच जलपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला. मात्र, एखाद्या राजकीय पक्षाच्या वतीने धरणावर जलपूजन करण्याचा पायंडा शनिवारी भाजपाने पाडला. जलपूजनाच्या निमित्ताने भाजपेयींनी मग आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धरणावरच भाषणांचे सिंचन झाले आणि गोदामाईला पालिका विजयाचे साकडे घालण्यात आले.
गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले. त्यावेळी स्थानिक भाजपा आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने नाशिककरांमध्ये भाजपाविषयी रोष कायम आहे. भाजपाच्या या भूमिकेचे नेमके राजकीय भांडवल करत भाजपा विरोधक टीका करत आले आहेत. जुलै महिन्यात पहिल्यांदा पाऊस पडल्यानंतर गंगापूर धरणातील पाणीसाठा ६६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. त्यावेळी भाजपाकडून जलपूजन होण्याची कुणकुण लागताच महापौरांनी लगोलग जाऊन जलपूजनाचा कार्यक्रम उरकला होता. त्याची सल भाजपाच्या मनात होती. अखेर गंगापूर धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर जाऊन पोहोचल्यानंतर शहर भाजपानेही धरणावर जलपूजनाचा कार्यक्रम आखला. त्यानुसार, शनिवारी भाजपाचे नगरसेवक दिनकर पाटील आणि कॉँग्रेसच्या नगरसेवक लता पाटील या दाम्पत्याच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. जलपूजनानंतर धरणावरील विश्रामगृहावरच बैठक बसली आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांकडून भाषणांचे सिंचन करण्यात आले. माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी महापालिका निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन केले.