भाजपाची विमानसेवा तर राष्ट्रवादीची मेट्रो ट्रेन
By Admin | Updated: February 14, 2017 01:51 IST2017-02-14T01:51:19+5:302017-02-14T01:51:38+5:30
कल्पक योजनांची स्पर्धा : भुजबळ यांच्या योजना मनपाच्या माथी

भाजपाची विमानसेवा तर राष्ट्रवादीची मेट्रो ट्रेन
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांची कल्पक भरारी सुरू झाली आहे. भाजपाने नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास नाशिकमधून थेट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची दिलेली ग्वाही ताजी असतानाच आता राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात मोठी भरारी घेतली आहे. महापालिकेत सत्ता आल्यास मेट्रो ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. बरे तर ही मेट्रो नाशिक शहरापुरतीत न राहाता महापालिकेची हद्द ओलांडून अन्य तालुक्यांतही शिरणार असून, हे सर्व पालिकेच्या आवाक्यातील आहे का असा प्रश्न केला जात आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केले असून, सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. त्यातील अनेक योजना यावेळी मांडण्यात आल्या असल्या तरी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी पालकमंत्री असताना मांडलेल्या आणि कार्यवाहीत असलेल्या काही योजनांचा त्यात समावेश असून मेट्रो ट्रेनची योजना तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे मांडली होती. मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी नाशिक शहर अपूर्ण पडत असल्याचे त्यावेळी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणणे मांडले होते. त्यामुळे नाशिक शहरापुरतीच नव्हे तर ग्रेटर म्हणजे बृहन नाशिकचा विचार करून देवळाली, भगूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, ओझर, निफाड या तालुक्यांना जोडणारी सेवा असावी, अशी त्यावेळी सूचना करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात हाच राष्ट्रवादीचा विषय घेण्यात आला आहे, मात्र तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली होती आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ती महापालिकेच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या केंद्रात आणि राज्यात राष्ट्रवादी अंशत: सत्तेवर नाही, त्यातच महापालिकेच्या आर्थिक आणि भौगोलिक मर्यादा बघता या जाहीरनाम्यातून मनोरंजन होत आहे.
गंगापूर धरणाच्या वर किकवी धरण बांधण्याचा प्रस्ताव असाच जुना आहे. छगन भुजबळ पालकमंत्री असताना किकवी धरण बांधण्यावर शिक्कामोर्तब झाले असताना आता किकवी धरण बांधण्याचे जाहीरमान्यात म्हटले असून, आता शासनाने घेतलेली जबाबदारी महापालिका आपल्या गळ्यात मारून घेणार काय, असा प्रश्न आहे. उद्योजकांची मते मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या सांडपाण्याची जबाबदारी पालिकेच्या गळ्यात घेण्याचा राष्ट्रवादीचा विचार असून, त्यामुळे जबाबदारी असलेल्या एमआयडीसी मात्र जबाबदारी मुक्त होणार आहे. कार्यक्षेत्रात आणि अधिकारात नसलेल्या अनेक योजना राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात असून, त्यात औद्योगिक शांतता व सुरक्षितता टिकवणे हा एक भाग आहे. याशिवाय चांगले फुटपाथ, अद्ययावत रुग्णालय, वाहतनळ, झोपडपट्टी विकास, कविता राऊत स्पोटर््स अकॅडमी, एक्झीबिशन सेंटर, युवा विकास केंद्र, गोदावरी नदीचे संरक्षण असे तेच ते अनेक विषय विकासनाम्यात घेण्यात आले आहे.