सेनेच्या अपप्रचाराला भाजपा देणार उत्तर
By Admin | Updated: March 18, 2016 23:56 IST2016-03-18T23:53:34+5:302016-03-18T23:56:55+5:30
अस्तित्वासाठी धडपड : घरोघरी वाटणार पत्रके

सेनेच्या अपप्रचाराला भाजपा देणार उत्तर
नाशिक : भाजपाच्या मंत्र्यांकडील खात्यांशी संबंधित प्रश्न हाती घेऊन ‘नाशिक वाचवा’ अशी हाळी देणाऱ्या शिवसेनेला भाजपाने संधिसाधू व अस्तित्वासाठी चाललेली धडपड अशा शब्दात हिणवले असून, जे जे प्रश्न घेऊन शिवसेनेने शनिवारचा मोर्चा काढला आहे, त्या प्रश्नांवर सरकारची भूमिका विशद करणारी पत्रके घरोघरी वाटण्याचे ठरविले आहे. सत्तेत राहून प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हानही दिले आहे.
आरोग्य विज्ञानपीठाचे विभाजन, मराठवाड्यातील उद्योगांना स्वस्तात वीज, एकलहरा औष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारीकरणाचे स्थलांतर, गंगापूर धरणातील पाण्याची पळवापळवी, शहरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था असे प्रश्न हाती घेऊन शिवसेनेने ‘नाशिक वाचवा’ म्हणून मोर्चाचे आयोजन करताना संबंधित प्रश्नांशी निगडित असलेल्या भाजपामंत्र्यांची खिल्ली उडविणारे व्यंग फलक शहरात लावून वातावरण निर्मिती केली आहे. भाजपाने या साऱ्या प्रश्नांवर चुप्पी साधल्याने सेनेला आणखीनच चेव सुटला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ही सारी सेनेची अस्तित्वासाठी धडपड चालली असल्याचे सांगून, उपरोक्त प्रश्नांवर सरकारची भूमिका व सत्य जनतेसमोर आणण्यासाठी भाजपाच्या वतीने घरोघरी पत्रके वाटण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सेनेने केलेल्या व्यंगाची माहिती प्रदेश भाजपापर्यंत पोहोचती करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
या संदर्भात भाजपाचे नेते व माजी आमदार वसंत गिते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सेनेला सत्तेत राहून प्रश्न सोडविता येत नाही ही एक प्रकारे कबुलीच असून, मग त्यांनी मोर्चे काढण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावे, मोर्चे कोणी काढावे हे जनतेला माहिती असून, मग इतके दिवस सेना काय करत होती, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला हा सारा स्टंट असून, १९८५ पर्यंत अस्तित्व नसलेली सेना, १९९० मध्ये भाजपाबरोबर आल्यावरच सत्तेजवळ पोहोचली आहे हे सेनेच्या महानगरप्रमुखानेही विसरू नये. भाजपाने उपमहापौरपद दिल्यावरच ते सेनेच्या महानगरप्रमुखपदापर्यंत पोहोचले याचा विचारही करावा, असा टोला सावजी यांनी अजय बोरस्ते यांचे नाव न घेता लगावला आहे. (प्रतिनिधी)