भाजपचा डाव जनता खपवून घेणार नाही -राष्ट्रवादीमुळे राज्य चालविण्यास अडचण
By Admin | Updated: October 12, 2014 23:31 IST2014-10-12T23:04:00+5:302014-10-12T23:31:42+5:30
पृथ्वीराज चव्हाण : सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ येलूरला सभा

भाजपचा डाव जनता खपवून घेणार नाही -राष्ट्रवादीमुळे राज्य चालविण्यास अडचण
येलूर : महाराष्ट्र तोडण्याचा भाजपचा कुटिल डाव महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. काँग्रेस विचारसरणी नेहमीच राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येलूर (ता. वाळवा) येथे शिराळा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, सी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असणारे मुंबई शहर बदलून ते अहमदाबाद करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. देशाच्या सरहद्दीवर घुसखोरी वाढली असताना, पंतप्रधान सभा घेत फिरत आहेत. ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत आहेत. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे हे भाजपचे षड्यंत्र असून राष्ट्रवादीदेखील यामध्ये सहभागी आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसबरोबरची आघाडी तोडायचीच होती. त्यामुळे त्यांनी प्रत्येक बैठकीत वेगळा मुद्दा आणला. भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवारच नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.सत्यजित देशमुख म्हणाले की, गिरजवडे एम. आय. टँक, रस्ते, पूल, बसस्थानक, प्रशासकीय इमारती आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विरोधी उमेदवार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जनता त्यांना त्यांची जागा दाखविण्यास सज्ज झाली आहे.
जक्राईवाडीतील राष्ट्रवादीचे संजय गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब पाटील, गोविंदराव जाधव, संदीप जाधव, आनंदराव पाटील, उदयसिंग देशमुख, सुरेश कुराडे, के. डी. पाटील, महादेव कदम, गोपालराव जाधव, भानुदास मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)
राष्ट्रवादीमुळे राज्य चालविण्यास अडचण
राष्ट्रवादीच्या नेत्यांना बरोबर घेऊन राज्य चालविताना अनेक अडचणी आल्या. राष्ट्रवादी नेत्यांनी फायलींवर सह्या होत नाहीत असा आरोप केला. परंतु माझ्याच कालखंडात सर्वात जास्त ३६ हजार फायली निर्णायक केल्या. अनेक धोरणात्मक निर्णय घेतले, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.