भाजपा ठाण्याची भरपाई नाशिकला मागणार?

By Admin | Updated: August 16, 2016 23:12 IST2016-08-16T23:10:01+5:302016-08-16T23:12:01+5:30

पदवीधर निवडणूक : शिवसेनेला घालणार मदतीसाठी साकडे

BJP will ask for the compensation of Thane Nashik? | भाजपा ठाण्याची भरपाई नाशिकला मागणार?

भाजपा ठाण्याची भरपाई नाशिकला मागणार?

नाशिक : आगामी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करून भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी कॉँग्रेस व राष्ट्रवादीवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यातच ठाणे येथे शिवसेना उमेदवाराला मदत करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी धाव घेतल्याने त्याची भरपाई म्हणून नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला मदत करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आहे.
ठाणे येथील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना विजयी करण्यासाठी तसेच दगाबाजी नको म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या नगरसेवकांसह अन्य मतदारांना शिवसेनेला मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळेच वसंत डावखरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक विजयी झाले होते. आता राज्यात नाशिकसह अमरावती येथील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात भाजपाच्या वतीने नाशिकमधून डॉ. प्रशांत पाटील यांना, तर अमरावतीतून गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर
केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ तसे पाहिले तर भाजपाच्या ताब्यात राहिलेला मतदारसंघ आहे. तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचे शालक डॉ. सुधीर तांबे यांना कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळून ते विजयी झाले. तत्पूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रताप सोनवणे व त्यापूर्वी ना. स. फरांदे यांनी केले आहे.
शिवसेनेनेही भाजपाला विरोध म्हणून पदवीधर मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याची तयारी केल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात शिवसेनेकडे पदवीधरसाठी अद्याप तरी कोणी तयारी दर्शविली नसल्याचे सेनेच्या एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले; मात्र काही दिवसांपूर्वीच कॉँग्रेसच्या एका माजी नेत्याने शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने चचेला उधाण आले होते. दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेला मदत केली म्हणून, भाजपा नाशिक पदवीधर मतदारसंघात त्याची भरपाई म्हणून शिवसेनेने मदत करण्याची मागणी करू शकते. तसे झाले तर पदवीधर मतदारसंघात एकास एक लढत होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP will ask for the compensation of Thane Nashik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.