नगरसेविका पतीच्या ‘कार’नाम्यामुळे भाजप अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:12 IST2021-05-17T04:12:52+5:302021-05-17T04:12:52+5:30
नाशिक महापालिकेच्याच नव्हे तर खासगी रुग्णालयात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरची परवड होत आहे. हे सत्य सर्वांनी अनुभवले तरी बिटको रुग्णालयात ...

नगरसेविका पतीच्या ‘कार’नाम्यामुळे भाजप अडचणीत
नाशिक महापालिकेच्याच नव्हे तर खासगी रुग्णालयात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरची परवड होत आहे. हे सत्य सर्वांनी अनुभवले तरी बिटको रुग्णालयात त्यातल्या त्यात चांगली सेवा दिली जात असल्याने या रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठी मंत्र्यांचेदेखील महापालिका आयुक्तांना फोन आले आहेत. त्याच रुग्णालयात इंजेक्शन आणि बेड मिळत नाही, असे निमित्त करून नगसेविका डॉ. सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी शनिवारी (दि. १५) रात्री गेट तोडून कार आत घुसवण्याचा कारनामा केलाच, शिवाय शिवीगाळ केली असून भाजप अडचणीत आली आहे. स्वपक्षाच्या नगरसेविकेचा पतीच अशा प्रकारे कृत्य करीत असेल तर काय, असा प्रश्न शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केला आहे. तर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी भाजप अंतर्गत वादाचा फटका बसत असल्याची टीका केली आहे.
विरोधक आक्रमक होत असताना सत्तारूढ भाजपची मात्र अडचण झाली आहे. राजेंद्र ताजणे यांची पार्श्वभूमी बघता त्यांना अंगावर घेण्यास कोणीही तयार नाहीत. तोडफोड झाल्यानंतर ताजणे यांनी रुग्णालयाच्या अवस्थेकडे लक्ष वेधले असले तरी हे निमित्त करून त्यांची पत्नी नगरसेविका असून त्यांनी याबाबत काहीच आवाज का उठवला नाही, असाही प्रश्न केला जात आहे.
इन्फो...
भाजपशी किती समरस?
ताजणे हे मूळचे शिवसैनिक आहेत. सत्ता आणण्यासाठी भाजपने अनेकांना पक्षात प्रवेश दिला. संबंधितांची पार्श्वभूमी माहिती असतानाही ज्यांना प्रवेश दिला त्यातील ताजणे यादेखील एक आहेत. गेल्या प्रभाग समिती निवडणुकीत उमेदवारी देऊनही डॉ. सीमा ताजणे यांनी माघार घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला पुढे चाल दिली. यातच सध्या त्या भाजपत किती समरस झाल्या आहेत, हेच स्पष्ट होते.
इन्फो..
तोडफोडीच्या घटनेनंतर ताजणे यांनी आरोग्य सेवा अपुऱ्या असल्याचे कारण दिले आणि जणू हे राजकीय आंदोलन अगतिकतेतून घडल्याचा दावा केला आहे. त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ हॅशटॅग चळवळ सुरू केली असली तरी हल्ल्याचे समर्थन कसे करणार, हा प्रश्न आहे.
कोट...
घडलेली घटना दुर्दैवी आहे. डॉ. सीमा ताजणे या भाजप नगरसेविका असून त्या उच्च विद्या विभूषित आहेत. त्यांच्या पतीचे वेगळे विचार असू शकतात. ते काही भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यांनी जे काही केले ते समर्थनीय नाही.
- गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप