सेनेला डावलण्यात भाजपा यशस्वी

By Admin | Updated: August 14, 2016 01:58 IST2016-08-14T01:57:18+5:302016-08-14T01:58:50+5:30

ध्वजावतरण : पुरोहित संघाला धरले हाताशी; महापालिका निवडणुकीची तयारी

BJP succeeded in ousting Sena | सेनेला डावलण्यात भाजपा यशस्वी

सेनेला डावलण्यात भाजपा यशस्वी

नाशिक : पवित्र कुशावर्ती व गोदातटी आयोजित केलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजावतरण सोहळ्यापासून पुरोहित संघाला हाताशी धरून शिवसेनेला बाजूला सारण्यात भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली असून, सेनेचे मंत्री वा पदाधिकारी या कार्यक्रमास कसे येणार नाही याची एकीकडे पुरेपूर काळजी घेतानाच मित्रपक्षाचे महादेव जानकर यांना मान देऊन सेनेला खिजवण्याची संधीही साधून घेतली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या समाप्ती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह केंद्र व राज्यातील अशा जवळपास भाजपाच्या अर्धाडझन मंत्र्यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे हजेरी लावली. त्यांनी हजेरी लावावी यासाठी म्हणे दोन्ही ठिकाणच्या पुरोहित संघाने पुढाकार घेतला व त्यांच्या पुढाकारानेच दोन्ही ठिकाणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु असे आयोजन करताना पुरेपूर सहकार्य करण्याचा शब्द देणाऱ्या भाजपाने मात्र या सोहळ्यापासून शिवसेनेचे स्थानिक मंत्री व पदाधिकारी कसे दूर राहतील याची पुरोहित संघाला काळजी घेण्याचा सल्ला दिला, त्यामुळेच की काय पुरोहित संघाने जिल्ह्यातील मंत्री ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निमंत्रण देण्याचे सौजन्य न दाखविता, शिवसेना कार्यालयात त्यांच्या नावे पत्रिका पाठवून दिली.
खुद्द मंत्र्यांच्या बाबतीत पुरोहित संघाची ही भूमिका असताना सेनेचे खासदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांना तर कोणत्याच खिजगणतीत धरले नाही. त्यांच्याही निमंत्रण पत्रिका परस्पर पाठवून देण्यात आल्या. मुळात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभालादेखील भाजपाने ‘हायजॅक’ केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळा होत असताना, त्याच वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील नाशकात असताना ते सोहळ्यापासून दूर राहिले होते. साहजिकच ठाकरे आल्यामुळे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण सोहळ्याकडे पाठ फिरविली होती, हीच बाब त्यावेळी भाजपाच्या पथ्यावर पडून त्यांनी कुंभमेळा म्हणजे भाजपाचाच धार्मिक कार्यक्रम असल्याची प्रतिमा निर्माण केली होती.
त्याच्याच उत्तरार्धात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या सिंहस्थाचा ध्वजावतरण सोहळा जणू पक्षाने आयोजित केल्याचा व त्या माध्यमातून नाशिककरांची मने जिंकून घेण्याची खेळी भाजपाने खेळली आहे. ध्वजावतरण सोहळ्यापासून सेनेला दूर सारून भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा मानसन्मान करून भाजपाने राजकीय डाव साधत सेनेची खोडी काढली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP succeeded in ousting Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.