पालिकेत भाजपा सत्तारूढ

By Admin | Updated: March 15, 2017 00:57 IST2017-03-15T00:56:21+5:302017-03-15T00:57:41+5:30

नाशिक : महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध होत महापालिकेत भाजपा सत्तारूढ झाली आहे.

BJP ruling in the corporation | पालिकेत भाजपा सत्तारूढ

पालिकेत भाजपा सत्तारूढ

नाशिक : महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध होत महापालिकेत भाजपा सत्तारूढ झाली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाच्या हाती पूर्ण बहुमताने सत्ता आली आहे. महापौर - उपमहापौरपदाच्या बिनविरोध निवडीनंतर पालकमंत्र्यांनी ‘केअर टेकर’ची भूमिका घेण्याची तयारी दर्शवत पारदर्शक कारभाराची हमी दिली आहे, तर नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांनी सर्वांना सोबत घेऊन कारभार चालविण्याचा संकल्प सोडतानाच किकवी धरणासह आरोग्यविषयक प्रश्नांची तड लावण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजपा सत्तारूढ झाल्यानंतर महापालिकेच्या मुख्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला आणि भाजपाच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.

महापौर - उपमहापौरपदासाठी जिल्हाधिकारी बालसुब्रमण्यम राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी ११ वाजता प्रक्रियेला सुरुवात झाली त्यावेळी सभागृहात केवळ मावळते महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांचीच उपस्थिती होती. त्यामुळे पीठासन अधिकाऱ्यांनी अन्य सदस्यांना सभागृहात येण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी दिला. त्यानंतर मनसेचे सलीम शेख, योगेश शेवरे आणि नंदिनी बोडके हे सदस्य अवतरले.
बरोबर ११ वाजून १० मिनिटांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आणि त्याचवेळी पांढरा पोशाख आणि डोक्यावर हिरवी पट्टी असलेले भगवे फेटे घालून भाजपाचे नवनिर्वाचित पुरुष सदस्य, तर भगव्या साड्या व फेटे घालून महिला सदस्यांचे सभागृहात आगमन झाले. त्यापाठोपाठ शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादीसह अपक्ष-रिपाइंच्या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला.
विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या गळ्यात केवळ पक्षचिन्ह असलेले दुपट्टे होते. पहिल्यांदा महापौरपदासाठी निवडप्रक्रिया राबविण्यात आली. अर्ज छाननीनंतर माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. त्यात कॉँग्रेसच्या आशा तडवी यांनी माघार घेतल्याने भाजपाच्या रंजना भानसी यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यानंतर उपमहापौरपदासाठी निवडप्रक्रिया होऊन राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे यांनी माघार घेतल्याने भाजपाचे प्रथमेश गिते यांचीही बिनविरोध निवड झाली. स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपाचा महापौर - उपमहापौर विराजमान झाल्यानंतर भाजपासह विरोधी सदस्यांनीही त्यांचे बाके वाजवून स्वागत केले. त्यानंतर रंजना भानसी महापौरपदाचा गाऊन परिधान करत खुर्चीवर आसनस्थ झाल्या. यावेळी सभागृहाला संबोधित करताना रंजना भानसी म्हणाल्या, सलग पाच वेळा नगरसेवकपदी झालेली निवड आणि पक्षनिष्ठा याचे फळ आज मला पक्षाने दिले आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना दिलेला शब्द खाली पडू देणार नाही. ‘सबका साथ, सबका विकास’ यानुसार महापालिकेत वाटचाल सुरू राहील. पंतप्रधान मोदी यांचे स्मार्ट सिटी अभियान व स्वच्छ भारत अभियान यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

Web Title: BJP ruling in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.