सेनेला टक्कर देण्यासाठी भाजपा, मनसेची रणनीती
By Admin | Updated: January 13, 2017 01:07 IST2017-01-13T01:06:58+5:302017-01-13T01:07:13+5:30
प्रभाग २५ : तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न; सर्वांचे लक्ष लागून

सेनेला टक्कर देण्यासाठी भाजपा, मनसेची रणनीती
नरेंद्र दंडगव्हाळ सिडको
सलग दहा वर्षांपासून सेनेचे प्राबल्य असलेल्या सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये सेनेला शह देण्यासाठी मनसे, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच पक्ष सेनेच्या उमेदवारांसमोर ताकदवान उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करीत असून, याबाबत भाजपा व मनसे काय रणनीती आखणार आहे.
गेल्या वीस वर्षांपूर्वी सावतानगर, पाटीलनगर, मोती चौकासह येथील परिसरात कॉँग्रेसचे वर्चस्व होते. यानंतर मात्र गेल्या दहा वर्षांपासून सेनेने या ठिकाणी वर्चस्व निर्माण केले असल्याचे दिसत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे मनसेलाही जनतेने कौल दिल्याने सिडको भागात २२ पैकी तब्बल सात उमेदवार निवडून आले. परंतु अलीकडच्या काळात मनसेवर नाराज असलेले अनेक नगरसेवक हे मनसेतून इतर पक्षांत गेल्याने मनसेच्या उमेदवारावांची संख्या कमी झाली आहे. या प्रभागातून मनसेचे दोन विद्यमान नगरसेवक निवडणूक लढविणार असल्याने मनसेसाठीदेखील ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, विभागप्रमुख किरण शिंदे, महिला आघाडीच्या संघटक शोभा गटकळ, माजी नगरसेवक शोभा निकम, श्यामकुमार साबळे, पवन मटाले,अभय पवार आदि इच्छुक आहेत, तर मनसेकडून विद्यमान नगरसेवक अनिल मटाले, कांचन पाटील, अॅड. अतुल सानप, सचिन रोजेकर यांच्या आई सावित्री रोजेकर, तर भाजपाकडून मंडल उपाध्यक्ष अॅड. प्रकाश अमृतकर, मुरलीधर भामरे, मंडल अध्यक्ष गिरीश भदाणे यांच्या पत्नी वैशाली भदाणे, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष राकेश ढोमसे यांच्या पत्नी भाग्यश्री ढोमसे, युवा मोर्चा कोषाध्यक्ष केतन अवसकर यांच्या पत्नी आसावरी अवसरकर, गणेश अरिंगळे, संगीता पाटील, मनोज बिरार, आशिष हिरे आदि इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून अमोल नाईक, विजय मटाले, मुकेश शेवाळे आदि इच्छुक आहेत. कॉँग्रेसकडून माजी नगरसेवक अण्णा पाटील यांचे चिरंजीव भरत पाटील व अपक्ष म्हणून तुषार साळुंके इच्छुक आहेत.